मला नगराध्यक्ष करा 'मी 10,000 रुपये आणि घर देईन' बारामतीकरांना भलं मोठं स्वप्न दाखवणारे काळूराम चौधरी आहेत तरी कोण ?
आय मिरर
राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत. बारामती नगर परिषदेची निवडणूक देखील तब्बल नऊ वर्षानंतर पार पडत आहे. बारामती नगरपरिषदेवर नेहमीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची एक हाती सत्ता राहिली. यंदाच्या निवडणुकीत देखील अजित पवार मोठ्या ताकतीने मैदानात उतरले आहेत.
अशातच बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाकरिता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलेले बहुजन समाज पार्टीचे राज्याचे महासचिव काळुराम चौधरी त्यांनी बारामतीकरांना दाखवलेल्या मोठ्या एका स्वप्नामुळे राज्यभरात चर्चेत आलेत.
काळूराम चौधरी यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला.बारामतीकरांनी त्यांना संधी दिली, तर ते प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 10,000 रुपये देतील आणि मागेल त्याला 1BHK घर उपलब्ध करून देतील, असे भव्य आश्वासन चौधरी यांनी दिले आहे.
मतदारांना इतकं मोठं स्वप्न दाखवणारे आणि पवार कुटुंबाच्या राजकारणाला सातत्याने आव्हान देणारे हे काळूराम चौधरी नेमके तरी कोण आहेत? चला जाणून घेऊया त्यांचा दीर्घ प्रवास...
कोण आहेत काळूराम चौधरी...
काळूराम चौधरी हे बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव आहेत. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी काळुराम चौधरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चौधरी यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला.
काळूराम चौधरी हे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह खासदार सुप्रिया सुळे आणि एकूणच पवार कुटुंबाचे राजकीय विरोधक मानले जातात.
सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळख...
अनेक सामाजिक प्रश्नांवर काळूराम चौधरी यांनी आवाज उठवलेला आहे. बारामती शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या संदर्भातही काळुराम चौधरी यांनी आंदोलने केलेले आहेत. बारामती शहरात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या डंपरच्या अपघाताच्या घटनांवरूनही चौधरी यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाने दिवसा अवजड वाहनांना बारामती शहरातून प्रवेश बंद देखील केली. बारामती शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात चौधरी यांनी आवाज उठवलेला आहे. शहरातील पतविक्रेत्यांच्या प्रश्नांबाबतही चौधरी यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांचे प्रश्न शासन दरबारी त्यांनी लावून धरले.
पवार कुटुंबाच्या विरोधात विधानसभा लोकसभा लढवल्या...
काळूराम चौधरी यांनी बारामती मधील पवार कुटुंबाच्या विरोधात लोकसभेसह विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे. 2004 2009 आणि 2014 साली काळुराम चौधरी हे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणून बारामती विधानसभेला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात मैदानात होते. याच सोबत 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीत देखील काळुराम चौधरी यांनी बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवली. यावेळी काळूराम चौधरी यांना ३० हजाराहून अधिक मताधिक्य मिळालं होतं.
वयाच्या 17 व्या वर्षापासूनच चौधरी यांनी समाजसेवेला सुरुवात...
काळूराम चौधरी यांचं शिक्षण दहावीपर्यंत झाला आहे. संपूर्ण शिक्षण हे बारामती शहरामधील शाहू हायस्कूलमध्ये पूर्ण झालं. वयाच्या 17 व्या वर्षापासूनच चौधरी यांनी समाजसेवेला सुरुवात केली. वयाच्या 18 व्या वर्षी चौधरी यांची बारामती विधानसभेच्या अध्यक्षपदी बहुजन समाज पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली. 1999 साली चौधरी यांनी बारामती नगर परिषदेची पोटनिवडणूक लढवून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यातूनच पुढे त्यांना पुणे जिल्हा कोषाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रदेश सचिव अशा विविध पदांवरती काम करण्याची संधी मिळाली सध्या चौधरी यांच्याकडे राज्याच्या महासचिव पदाची जबाबदारी आहे. याशिवाय बहुजन समाज पार्टीचे स्टार प्रचारक म्हणून देखील चौधरी सर्व दूर परिचित आहेत.
काळूराम चौधरी यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती असून ते स्वतः उत्तम शेतकरी देखील आहेत. सामाजिक काम करीत असतानाच स्वतःची शेती देखील ते मोठ्या जिद्दीने का कसतात. त्याशिवाय चौधरी यांच्या पत्नी अर्चना चौधरी या स्वस्त धान्य दुकान चालवतात.
What's Your Reaction?