इंदापूरात प्रवीण मानेंचा सुप्रिया सुळेंना धक्का !अजित पवारांना समर्थन दर्शवत घेतला मोठा निर्णय 

Apr 7, 2024 - 17:00
Apr 7, 2024 - 17:07
 0  507
इंदापूरात प्रवीण मानेंचा सुप्रिया सुळेंना धक्का !अजित पवारांना समर्थन दर्शवत घेतला मोठा निर्णय 

आय मिरर (देवा राखुंडे)

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपलं समर्थन दर्शवलयं त्यामुळे इंदापूर विधानसभेत खासदार सुप्रिया सुळे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा माने यांच्या खांद्यावरती होती मात्र माने यांनी अजित पवारांना समर्थन दर्शवल्याने सुप्रिया सुळेंना हा मोठा धक्का मानला जातोय. रविवारी 7 एप्रिल रोजी सोनाई पॅलेस या निवासस्थानी माननीय पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रवीण माने यांनी आपल्या समर्थन अजित पवार यांना दर्शवले नव्हते मात्र असे असले तरी प्रवीण माने हे शरद पवार यांच्या सोबत होते बारामती लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची इंदापूर तालुक्याची धुरा प्रवीण माने यांच्या खांद्यावर देण्यात आली होती आणि त्यानुसार प्रवीण माने यांनी सुळेंच्या प्रचाराचा शुभारंभही केला आणि तालुक्यातील मतदारांना सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचं आवाहनही केलं.

दरम्यान 23 मार्च रोजी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार खासदार संजय राऊत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापुरात पार पडलेल्या भव्य शेतकरी मेळाव्याला प्रवीण माने यांनी अचानक दांडी मारली आणि तेव्हापासूनच प्रवीण माने यांच्या बद्दल विविध चर्चांना उधाण आलं होतं. मागील दोन दिवसांपूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस हे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासाठी इंदापुरात आले तेव्हा फडणवीसांच्या स्वागताला प्रवीण माने उपस्थित होते. फडणवीस यांनी माने कुटुंबाच्या घरी सदिच्छा भेट देत चहापाण घेतलं आणि याच वेळी प्रवीण माने हे आता महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा प्रचार करतील हे जवळपास निश्चित झालं होतं. आज रविवारी प्रवीण माने यांनी स्वतः पत्रकार परिषदेत घेत या सर्व गोष्टींवरती शिक्कामोर्तब केलं आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे हे देखील उपस्थित होते.

विकासाच्या मुद्द्यावर अजित दादांना साथ…

अजित पवार हे कामाचा माणूस आहे, सकाळी पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत अगदी झपाटल्यासारखं काम करणारा राज्यातील एकमेव नेता म्हणून त्यांची ओळख आहे. इंदापूर तालुक्याचा जो काही विकास झाला आहे कायापालट झाला आहे तो केवळ दादांमुळे झाला आहे.मी सुप्रिया सुळे यांचा प्रचार जरूर केला,मात्र तोपर्यंत महायुतीकडून कोण उमेदवार हे स्पष्ट नव्हते. ज्या दिवशी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची महायुतीकडून घोषणा झाली त्याच दिवसापासून मी सुप्रिया सुळेंचा प्रचार थांबवला,असं प्रवीण माने यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांना साथ देण्यासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि अजित पवारांचे हात बळकट करण्यासाठी आपण महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचही माने यांनी सांगितलं. याशिवाय आजपासूनच आपण आमदार दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासोबत सुनेत्रा पवारांच्या प्रचारालाही सुरुवात करणार असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले आहे.

कुठेही ईडीचा नेत्यांचा दबाव नाही……

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारातून प्रवीण माने अचानक शांत का झाले ? 23 मार्च रोजी झालेल्या शरद पवारांच्या सभेलाही मानेंनी दांडी का मारली? मानेंवर कोणत्या बड्या नेत्याचा दबाव आहे का? का राज्यात सुरू असलेला ईडीचं घामासान मानेंपर्यंत पोहोचलं आहे.असे अनेक प्रश्न इंदापूरकरांनी उपस्थित केले होते. दरम्यान दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मानेंची भेट घेतली आणि त्यानंतर लागलीच माने हे महायुतीच्या समर्थनार्थ उतरले.या सर्व प्रश्नांवरती आपल्यावर कोणाचाही दबाव नाही. कोणाच्याही दाबावाला बळी पडून आपण हा निर्णय घेत नसल्याचे माने यांनी स्पष्ट केले आहे.

दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळूनही बारामतीचा विकास होऊ शकला नाही - गारटकर 

बारामतीचा विकास हा अजित पवार यांच्या हाती सत्ता आल्यानंतरच झाला,स्पष्ट बोललं पाहिजे खर्‍याला खरं म्हटलं पाहिजे रोहित पवार वालचंदनगर येथील शाळेत शिकायला होते.कारण त्यावेळी बारामती मध्ये शिक्षणाची सोय नव्हती, दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळूनही बारामतीचा विकास होऊ शकला नाही अशा शब्दात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

गारटकर म्हणाले की 80 च्या दशकात अकलूज हे शिक्षणाचे मॉडेल होते. देशभरातून विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेत होते. त्या काळात बारामतीत म्हणाव्या अशा सुविधा नव्हत्या बारामतीत प्रगती फक्त अजित दादाच्या हातात सत्ता आल्यावर झाली आहे तुम्हाला कितीही वाईट वाटलं तरी खरं बोललं पाहिजे असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

आम्ही काय अजित पवार यांचे लाभार्थी नाही, कोणताही लाभ त्यांच्याकडून घेतला नाही, त्यांच्याकडून कोणता लाभ मिळेल यांची खात्री नाही परंतु ही निवडणूकित राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रचार करणार.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow