PUNE : धक्कादायक ! केवळ पिझ्झा उशिरा दिला म्हणून डिलिव्हरी बॉयवर थेट गोळीबार

आय मिरर
पिझ्झा डिलिव्हरी देण्यास उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केली.एवढेच नाही तर त्याच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळ मंगळवारी (दि.24) रात्री उशिरा घडला आहे. याप्रकरणी एकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रोहित राजकुमार हुलसुरे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन वसंत पडवळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करतात. मंगळवारी रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला होता.पिझ्झा डिलिव्हरी ऑर्डर डिलिव्हरी बॉय हुलसुरे याने उशिरा पोहोचल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली.याच कारणावरुन चेतन पडवळ याने डिलिव्हरी बॉय रोहित याला मारहाण केली.
या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र, राहुल आणि इतर त्याचे मित्र गेले असता आरोपीने सर्वांना माराहण केली. तसेच कारमधून एक पिस्टल बाहेर काढून हवेत गोळीबार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी पडवळ याच्यावर जीवीतास धोका निर्माण होईल असा प्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
What's Your Reaction?






