अपहरण व खूनाच्या आरोपाखाली इंदापूर पोलिसांकडून तिघांना अटक
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील पंधरवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरुन तरुणाचे अपहरण करुन त्याचा खून केल्याची घटना घडली असून याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना पाच डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश इंदापूर न्यायालयाने दिला आहे.
यामध्ये गणेश लक्ष्मण शिंदे (वय 33 वर्षे), मच्छिंद्र लक्ष्मण शिंदे (वय 30 वर्षे),आकाश सुरेश शिंदे (वय 22 वर्षे) (सर्व रा.पंधारवाडी ता.इंदापूर) अशी आरोपींची नावे असून वैभव शिवाजी पारेकर (वय 26 वर्षे रा. पंधारवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मयताचे वडील शिवाजी दामू पारेकर (वय 54 वर्षे, रा.पंधारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुरुप 28 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शिवाजी पारेकर हे आपली पत्नी कांताबाई व मुलगा वैभव यांच्या समवेत जेवण करुन बसले असताना वरील तीन ही आरोपी घरी आले. यामध्ये गणेश शिंदे याने घरात येवून आपल्याला भांडगाव येथे जायचे आहे. तू आमच्या सोबत चल असे वैभवला सांगितले. वैभवने आपण या तिघांबरोबर भांडगावला चाललो आहोत असे फिर्यादीला सांगितले. गणेशने आणलेल्या चार चाकी वाहनातून त्या तिघांबरोबर वैभव निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो आला नाही. त्याची वाट पाहून सकाळची इतर कामे उरकून फिर्यादी आरोपींच्या घरी जावून आले. तेव्हा ते तिघे देखील रात्रीपासुन घरी आले नाहीत असे त्यांचे घरच्यांनी फिर्यादीला सांगितले. त्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत वैभवचा तपास लागला नाही. त्यामुळेच गणेशने त्याच्या सहका-यांच्या मदतीने वैभवला गुप्तपणे अटकेत ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण करुन त्याचा घातपात केला असावा अशी फिर्यादीची खात्री झाली. त्यावरून त्यांनी आरोपींविरुद्ध इंदापूर पोलीसांकडे तक्रार केली.
तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार करत आहेत.
What's Your Reaction?