अनोळखी मृतदेहाची ओळख पटवली अन् श्रीरामपूरमधून आरोपीला बेड्या

Oct 23, 2026 - 06:35
 0  164
अनोळखी मृतदेहाची ओळख पटवली अन् श्रीरामपूरमधून आरोपीला बेड्या

आय मिरर

निर्जन ठिकाणी तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपींचा शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावला. कोंढापुरी येथील तलावाच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरपर्यंत आरोपींचा माग काढत एका संशयिताला अटक करण्यात आली.

 

या प्रकरणात दोन अल्पवयीन बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. शिक्रापूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने खुनाचा गंभीर गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला आहे.

बुधवारी (दि. २१) सकाळी सातच्या सुमारास शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावच्या हद्दीत खंडोबा मंदिरासमोरील तलावाच्या कडेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली.

 

मृतदेहाची पाहणी केली असता शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक जखमा दिसून आल्या. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासाठी दोन पथके रवाना केली. तपास पथकांनी मृताची ओळख पटवली असता महेंद्र लव सकट (वय २४, रा. रांजणगाव गणपती, ता.शिरूर,जि.पुणे) असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना रांजणगाव परिसरातील तिघांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला.

दरम्यान, संशयित अहिल्यानगर जिल्ह्यात पळून गेल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने त्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी संशयितांचा माग काढत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बायपास परिसर गाठला. तेथे तिन्ही संशयित मिळून आले. चौकशीत प्रथमेश नानासाहेब राऊत (रा.फंडवस्ती, रांजणगाव गणपती, ता.शिरूर मूळ रा. ढोकसांगवी, ता.शिरूर) याच्यासह दोन अल्पवयीन बालकांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आले. पोलिसांनी प्रथमेश राऊत याला अटक केली असून दोन्ही अल्पवयीन बालकांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृत महेंद्र सकट, आरोपी आणि अल्पवयीन बालके एकमेकांच्या परिचयातील होते. कोणासोबत फिरायचे आणि कोणाशी बोलायचे, यावरून मृत तरुण व अल्पवयीन बालकांमध्ये वाद होता. याच वादातून मृताला गांजा पिण्याचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तेथे दोन चाकूंनी त्याच्यावर १८ ते २० वेळा वार करून खून केल्याची माहिती चौकशीतून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या खुनामागील नेमके कारण आणि संबंधितांची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनमंतराव गिरी राहुल देशमुख आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन सुद्रिक राहुल गडदे करीत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेश कोळी, अंकुश कारंडे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, विश्वभर वाघमारे, अमोल चव्हाण तसेच पोलीस कॉन्स्टेबल राम जाधव, नारायण वाळके आणि मच्छिंद निचीत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow