‘औरंगजेबी’ राजकारणाविरोधात काँग्रेसचा हुंकार मोदी–फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना करत हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट हल्लाबोल
आय मिरर
महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकतेचा, लोकशाहीचा आणि स्वाभिमानाचा गंभीर पेच निर्माण झाला असताना ऐतिहासिक पुरंदरच्या भूमीतून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक एल्गार पुकारला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट मुघल शासक औरंगजेबाशी करत त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
“सत्ता टिकवण्यासाठी हुकूमशाही, कपट, फूट आणि दडपशाहीचा वापर हीच औरंगजेबी प्रवृत्ती आहे आणि ती आजच्या सत्ताधाऱ्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे,” असा आरोप त्यांनी केला. सपकाळ सोमवारी रात्री काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आले होते यावेळी त्यांनी भाजपवर आणि त्यांच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला.
सपकाळ म्हणाले की, “पुरंदर ही केवळ भौगोलिक जागा नाही, तर स्वराज्याचा आत्मा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या मातीत झाला, त्या भूमीत अन्यायासमोर कधीही मान झुकवली गेली नाही. आज मात्र याच महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा आवळण्याचे काम सुरू आहे.” या भाषणातून सत्ताधाऱ्यांचे अनेक राजकीय मुखवटे गळून पडल्याचा दावा त्यांनी केला.
देशाच्या पंतप्रधानपदाला नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांसारख्या नेत्यांची गौरवशाली परंपरा आहे, असे सांगत सपकाळ म्हणाले की, “डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीतही देशाची अर्थव्यवस्था सावरली, माहितीचा अधिकार आणि अन्नसुरक्षा कायदा देऊन लोकशाही मजबूत केली. मात्र आज ‘५६ इंची छाती’ची भाषा करणारे नेतृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर सरेंडर करत असल्याचे चित्र आहे.”
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला की धोरणे बदलतात, इस्रायलशी संबंधित आंतरराष्ट्रीय आरोपांवर देशाची मान खाली जाते, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
‘बडे मिया – छोटे मिया’ : मोदी–फडणवीस जोडीवर घणाघात...
“दिल्लीतील फेकूगिरी आणि महाराष्ट्रातील फडणवीसांची राजकारणाची पद्धत यात फारसा फरक नाही,” असे म्हणत सपकाळ यांनी “बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह” ही म्हण वापरली. देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती ‘जल्लाद’ आणि ‘दरिंदा’ असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, “जल्लाद जसा फासावर लटकवतो, तसंच या सरकारने महाराष्ट्राची लोकशाही, संविधान, संस्कृती आणि राजकीय सभ्यता फासावर लटकवली आहे.”
फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करताना सपकाळ यांनी अनेक मुद्दे मांडले.
• ज्येष्ठ नेत्यांचे खच्चीकरण – लालकृष्ण अडवाणींपासून ते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचे वारसदार यांना बाजूला सारण्याचा पॅटर्न.
• नावे पुसण्याचे राजकारण – विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारशावर घाला.
• फोडा आणि राज्य करा नीती – मराठा विरुद्ध ओबीसी, धर्माधर्मांत तेढ निर्माण करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न.
“औरंगजेबाची कपटी सत्ता नीती आणि फडणवीसांची कार्यपद्धती यात फरक उरलेला नाही,” असा घणाघात त्यांनी केला.
औरंगजेबाने पुरंदरमध्ये संभाजी महाराजांना विचारलेली ‘स्वराज्य म्हणजे काय?’ ही ऐतिहासिक घटना आठवत सपकाळ म्हणाले, “माती, हवा, पाणी, डोंगर आणि स्वाभिमानी माणसं म्हणजे स्वराज्य. आज या स्वराज्यावरच घाला घातला जात आहे. सैन्याने जे मिळवता आलं नाही, ते आज कपटाने मिळवण्याचा प्रयत्न होतोय.”
राज्यातील विकास कागदापुरता असून प्रत्येक योजनेतून पैसा काढून निवडणुकांसाठी वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित शेतांमध्ये ड्रग फॅक्टरी सापडल्याचा उल्लेख करत त्यांनी “ही महाराष्ट्राच्या मातीला लागलेली काळीमा आहे,” असे म्हटले.
“नाच बुलबुल की पैसा मिलेगा” आणि “पैसा फेक तमाशा देख” ही संस्कृती राज्यात रुजवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.यापूर्वी अशी टीका केल्यानंतर आपल्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी झाली होती, याचा उल्लेख करत सपकाळ म्हणाले, “आम्ही धमक्यांना घाबरत नाही. सत्य बोलणे हा गुन्हा असेल, तर तो आम्ही पुन्हा पुन्हा करू.”
पुरंदरच्या तहाचा संदर्भ देत सपकाळ म्हणाले की, “किल्ले गमावले गेले, पण शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वराज्य उभं केलं. आजही पक्ष फोडले जात आहेत, किल्लेदार पाडले जात आहेत, पण सत्याचा विजय अटळ आहे.”औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या कबरीवर दिवा लावणारे कुणी उरले नाही, मात्र संभाजी महाराजांचे बलिदान आजही प्रेरणास्थान आहे, “ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान, संस्कृती आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे. पुरंदरच्या मावळ्यांनी यावेळी इतिहास घडवावा,” असे आवाहन करत सपकाळ यांनी भाषणाची सांगता केली.
या आक्रमक वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात तीव्र खळबळ उडाली असून, आगामी निवडणुकीत या ‘पुरंदरच्या एल्गाराचे’ मोठे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?