Big Breaking पुरंदरच्या नीरामध्ये जीबीएसमुळे एकाचा मृत्यू ! एका रुग्णाची आजारावर मात

Mar 5, 2026 - 18:35
Mar 5, 2026 - 18:36
 0  288
Big Breaking  पुरंदरच्या नीरामध्ये जीबीएसमुळे एकाचा मृत्यू  ! एका रुग्णाची आजारावर मात

आय मिरर 

पुणे जिल्ह्यातील निरा परिसरात गिलियन-बारे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. उपचारादरम्यान ५० वर्षीय मन्सूर सय्यद यांचा मृत्यू झाला, तर ४६ वर्षीय कस्तुरी पटेल या महिला रुग्णाने वेळेत उपचार घेत पूर्णपणे बरे होत घरी परतल्याची माहिती प्रशासनाने दिली.

आरोग्य विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, मन्सूर सय्यद यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. जीबीएसची लक्षणे दिसू लागल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले; मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, कस्तुरी पटेल यांना सुरुवातीच्या टप्प्यातच निदान झाल्याने तातडीने उपचार देण्यात आले आणि त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या.

जीबीएस हा संसर्गजन्य आजार नसून तो मज्जासंस्थेवर परिणाम करतो. काही वेळा दूषित पाणी किंवा अन्नातून झालेल्या संसर्गानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून मज्जातंतूंवर परिणाम करते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निरा परिसरात घरोघरी सर्वेक्षण, पाणी स्रोतांची तपासणी आणि सॅनिटरी सर्व्हेलन्स सुरू केले आहे.

२६०० घरांपैकी सुमारे २००० घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू आहे. परिसरातील १९ खाजगी दवाखान्यांवर देखरेख ठेवण्यात आली आहे.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी वैद्यकीय पथकांना आवश्यक सूचना देत उपाययोजना वेगाने राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

निरा येथे २४ तास आपत्कालीन आरोग्य कक्ष कार्यरत असून गंभीर रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी केले आहे.

तर “नागरिकांनी घाबरू नये. जीबीएस हा वेळेत निदान आणि उपचार झाल्यास बरा होऊ शकतो. प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे.“जीबीएस संसर्गजन्य नाही. मात्र दूषित पाण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे. हाता-पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र हंकारे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow