अगोदर सख्ख्या भावाची जळजळीत टीका त्यानंतर पुतण्याचा मात्र यूटर्न

Mar 20, 2024 - 07:40
 0  1729
अगोदर सख्ख्या भावाची जळजळीत टीका त्यानंतर पुतण्याचा मात्र यूटर्न

आय मिरर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पवार कुटुंबातले वादही समोर येऊ लागले आहेत. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी बारामतीच्या काटेवाडीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांवर टीका केली.

'25 वर्ष मंत्री केलं, चार वेळा मुख्यमंत्री केलं, तरीही काकांनी माझ्यासाठी काय केलं म्हणायचं? पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला दुसऱ्या व्यक्तीकडून लाभ मिळेल म्हणून वय झालेल्या व्यक्तीची किंमत करायची नाही, यासारखा नालायक माणूस नाही', अशी टीका श्रीनिवास पवार यांनी केली.

पवार कुटुंबातून आली प्रतिक्रिया

श्रीनिवास पवार यांच्या या टीकेवर त्यांचे पूत्र युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'बापू कसे आहेत सगळ्यांनाच माहिती आहे. बापू सरळ स्पष्ट बोलणारे आहेत, याला मीडियाने ट्विस्ट दिला आहे. तसं त्यांना बोलायचं नव्हतं. शेवटी भावा-भावाचं नातं तुटत नसतं. त्यांनी वेगळी भूमिका घेतली, काल दादाबद्दल बोलले नाहीत. बापूंच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला गेला. काल आजीचा वाढदिवस होता, तेव्हा दादा आणि बापू एकत्र आले होते. दादांवर बापूंचं प्रेम आहे, पण राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं. काटेवाडीतील पुढाऱ्यांना बापू बोलले आहेत, दादांना बापू असं कधीच बोलणार नाही. हा शब्द त्यांनी गावातील काही लोकांसाठी वापरला', असं युगेंद्र पवार म्हणाले.

काटेवाडीत काय म्हणाले होते श्रीनिवास पवार?

'मी नेहमीच अजितदादा यांच्याबरोबर राहिलो. चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काय निर्णय घेतले त्याला मी नेहमीच साथ दिली. मी कधीही विचारले नाही असं का करायला पाहिजे म्हणून? बऱ्यापैकी लोक मला ओळखतात. इथेच मी लहानाचा मोठा झालो आहे. जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा मी म्हणाले की आमदारकी अजितदादांकडं आहे तर, खासदारकी साहेबांकडं असावी, साहेबांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. साहेबांचं वय 83 झालं असून त्यांना सोडणं हे मला पटलं नाही,' असं श्रीनिवास पवास यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, 'तेव्हा माझ्या काही मित्रांनी देखील मला सांगितलं की पुढचे वर्ष आता अजित पवार यांचे आहेत. मात्र हा विचार पटला नाही. कारण जर आई-वडिलांनी शेत आपल्या नावावर केलं तर त्यांना आपण बाहेर काढायचं नसतं. आता तुमचं वय झालं तुम्ही घरी बसा किर्तन करा असा सल्ला देणं हे अतिशय वेदनादायी आहे. प्रत्येक औषधाची एक एक्सपायरी डेट असते. तसेच काही नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते, ती संपली असं म्हणायचं आणि पुढे चालायचं असंही यावेळी श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow