ही माझी पत्नी, मीच तिची हत्या केली ! पत्नीच्या हत्येनंतर पतीने लावला पोलिसांना फोन
आय मिरर
मुंबईतील बोरीवली परिसरात असलेल्या भीमनगर, गोराई भागात बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीने आपल्या पत्नीची क्रूरपणे हत्या केली. घटनेची माहिती बोरीवली पोलीस स्टेशनमधील हवालदार भाऊदास जेजीराम गांगुर्डे यांना सायंकाळी 5 वाजता मिळाली.
त्यांना मिळालेल्या MDT टॅबवरील संदेशात नमूद केले होते की, गोराई-1 च्या गल्ली क्रमांक-4, दुर्गामाता मंदिराच्या जवळ एका व्यक्तीने 100 क्रमांकावर फोन करून स्वतःच आपल्या पत्नीची हत्या केल्याचे सांगितले आहे.
ही माहिती मिळताच पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहचले. घराच्या दाराजवळ ओमराज रामचंद्र सरगोत्रा (वय 47) नावाचा एक व्यक्ती उभा होता. त्याच्यासोबत त्याची 14 वर्षीय मुलगी जिविका होती.
घराच्या आतमध्ये एका गादीवर एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि आसमानी रंगाचा पायजमा घातला होता. तिच्या चेहरा, भुवया आणि कपाळावर गंभीर जखमा आणि रक्ताचे गोळे स्पष्ट दिसत होते. खोलीत ठेवलेल्या टिपॉयची काठी, फरशी, चादर आणि गादीवरही रक्ताचे डाग आढळले.
पोलिसांनी ओमराजला प्रश्न विचारायला सुरुवात केली असता, त्याने पोलिसांना मध्येच थांबवत स्वतःच बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, "पोलीस कंट्रोल रूमला मीच 100 नंबरवर कॉल केला आहे. ही महिला माझी पत्नी आहे. तिने मला अनेक वर्षांपासून त्रास दिला होता. तिने माझ्यावर गेल्या 3 वर्षांपासून केस दाखल केली आहे आणि 2 वर्षांपासून ती माझ्यापासून वेगळी राहत आहे. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास तिने माझ्यासोबत भांडण केले. त्यामुळे मी तिचा गळा दाबला आणि तिच्या तोंडावर हाताने जोरदार ठोसा मारून तिची हत्या केली."
यानंतर पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. जखमी महिला प्राची ओमराज सरगोत्रा (वय 48) हिला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले, परंतु तिथे उपचार सुरू होण्यापूर्वीच सायंकाळी 6.50 वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या संपूर्ण घटनेत एका मजबूर मुलीने आपल्या डोळ्यासमोर आईचा खून होताना पाहिला, पण ती काहीही करू शकली नाही. बोरीवली पोलिसांनी आरोपी ओमराज रामचंद्र सरगोत्रा याला अटक करून त्याच्याविरोधात खुनाचा (हत्येचा) गुन्हा दाखल केला आहे.
What's Your Reaction?