बिग ब्रेकिंग| बारामतीच्या नगराध्यक्षपदी जय पवारांना संधी ? दादांकडून धक्कातंत्राचा अवलंब होणार ?
आय मिरर
बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने मोठी चढाओढ निर्माण झाली आहे. अशातच आता नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे.मात्र याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यातून अंतर्गत हेवेदावे निर्माण होऊ शकतात. हे हेवेदावे जागेवरच थांबवण्यासाठी जय पवार यांना मैदानात उतरवले जाऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. अजित पवार याबाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय पवार यांच्या नावाची चर्चा...
बारामती नगरपरिषदेसाठी तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून ही संधी आपल्यालाच मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत.
बारामती नगरपरिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून नगराध्यक्षपदाची संधी मिळवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र ऐनवेळी अजित पवार यांनी काही निर्णय घेतला तर त्यांचे चिरंजीव जय पवार यांचेही नाव पुढे येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बारामतीत अजित पवार यांचा वरचष्मा...
बारामतीत आजवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरचष्मा राहिला आहे. मात्र पक्षातील फुटीनंतर कार्यकर्त्यांचीही विभागणी झालेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांना नगराध्यक्षपदासह अन्य ठिकाणी योग्य आणि लोकांशी संपर्कात असणारा उमेदवार द्यावा लागणार आहे. अशातच त्यांनी जय पवार यांच्या नावाचा विचार केल्यास निवडणुकीत वेगळीच रंगत पाहायला मिळेल, अशीही चर्चा आहे.
जय पवार यांचे मतदान बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातच आहे. तर त्यांचे वडील अजित पवार व आई खासदार सुनेत्रा पवार यांचे मतदान मात्र ग्रामीण भागात काटेवाडी येथे आहे. त्यामुळे नगरपरिषदेसाठी जय पवार यांना संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे.
धक्कातंत्राचा अवलंब...
बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी अचानक स्वतःची उमेदवारी जाहीर करीत विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी स्वतःकडे घेतले त्यामुळे नगरपरिषद निवडणूकीत जय पवार यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर करून अजित पवार हे धक्कातंत्राचा अवलंब करू शकतात, अशा चर्चांनी ही आता जोर धरला आहे.
What's Your Reaction?