७२५ दिवसांपासून फारार आरोपीला बारामती शहर पोलिसांकडून अटक

Aug 19, 2026 - 06:51
Aug 19, 2026 - 06:53
 0  201
७२५ दिवसांपासून फारार आरोपीला बारामती शहर पोलिसांकडून अटक

आय मिरर 

खून प्रकरणात गेल्या 725 दिवसापासून फरार असलेल्या आरोपीला बारामती शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यासोबत न्यायालयीन वॉरंटमधील आणखी एका आरोपीलाही बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. अनिकेत संजय पवार, वय २० वर्षे, खंडोबानगर,बारामती अस खून प्रकरणातील अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मधील दाखल खून प्रकरणातील गुन्ह्यामध्ये आरोपी अनिकेत संजय पवार हा 725 दिवस फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी हा बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील माळावरची देवी जवळील जवाहर पार्क परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

तात्काळ पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार यशवंत पवार, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस शिपाई अक्षय सिताफ, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई सागर जामदार व पोलीस शिपाई विशाल शिंदे यांच्या पथकाने जवाहर पार्क परिसरात गोपनीयरीत्या सापळा रचला. आरोपी तेथे आल्यानंतर पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने तत्काळ पाठलाग करून झडप घालत त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले.

बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी नवनाथ उत्तम चोरमले रा. अहिल्यादेवी चौक, जळोची, बारामती यांनी दिलेल्या प्रथम खबरीतील हकीकतीनुसार त्यांचा भाचा गणेश धुळाबापू वाघमोडे, वय १७ वर्षे, रा. जळोची, ता. बारामती याचे सन २०२३ मध्ये टी.सी. कॉलेज परिसरात जयेश बाबासाहेब माने व त्याच्या साथीदारांशी भांडण झाले होते आणि त्या घटनेतून निर्माण झालेल्या पूर्ववैमनस्याच्या पार्श्वभूमीवर दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी गणेश हा मित्रांसोबत कपडे खरेदी करून जळोचीच्या दिशेने परतत असताना त्यांचा पाठलाग करण्यात आला. 

जळोची येथील काळ्या ओढ्याच्या पुलाजवळ चारचाकी वाहनातून आलेल्या व्यक्तींनी त्याचा रस्ता अडवून गणेशवर धारदार शस्त्राने हल्ला केला या त्याचा जागेतून मृत्यू झाला. 

तपासादरम्यान जयेश बाबासाहेब माने, शुभम प्रवीण गायकवाड, करण हनुमंत जाधव, आतिश संतोष गुरळकर, सोमनाथ रंगनाथ यादव, भोल्या उर्फ किशोर बापू भिसे, बंडू भिवा काळे उर्फ बी.के.अनिकेत संजय पवार तसेच इतर आरोपींची भूमिका तपासण्यात आली. विविध आरोपींना वेगवेगळ्या तारखांना अटक करण्यात आली, गुन्ह्यात वापरलेली वाहने व धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. 

अनिकेत संजय पवार हा मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना मिळून येत नव्हता. तपासामध्ये गुन्ह्यानंतर काही आरोपींच्या संपर्कात राहून त्यांना चारचाकी वाहनातून बाहेरगावी नेऊन सोडल्याचा त्याच्याशी संबंधित तपासाचा भाग समोर आला होता. त्याच्याविरुद्ध उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयीन कार्यवाही करण्यात आली होती. 

गुन्हा दाखल झालेल्या २२ ऑगस्ट २०२४ पासून १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ७२५ दिवस आरोपी फरार राहिला होता. इतका दीर्घ कालावधी उलटल्यानंतरही बारामती शहर पोलिसांनी त्याचा शोध सोडला नाही. स्थानिक गोपनीय माहिती, जुन्या नोंदी, आरोपीच्या संभाव्य हालचाली आणि क्षेत्रीय माहितीचा सातत्याने मागोवा घेत अखेर त्यास माळावरची देवी परिसरातून पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपीची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

याच गुन्ह्यातील भोल्या उर्फ किशोर बापू भिसे हा जामिनावर असताना न्यायालयाच्या तारखांना हजर राहत नसल्याने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्याचाही शोध सुरू असताना पोलीस हवालदार टापरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत त्याच्या ठिकाणाची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे त्यास बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेऊन वॉरंटची कायदेशीर अंमलबजावणी करण्यात आली आणि न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल व अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या निर्देशानुसार सन २००० पासून आजपर्यंतच्या जुन्या गुन्ह्यांतील फरार, पाहिजे तसेच न्यायालयीन प्रक्रियेला गैरहजर राहणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी पोलीस स्टेशन अभिलेखावरील जुन्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन पाहिजे व फरार आरोपींची माहिती अद्ययावत करणे, त्यांच्या जुन्या व सध्याच्या वास्तव्यासंबंधी माहिती गोळा करणे, गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय ठेवणे आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार अशा आरोपींना शोधून न्यायालयासमोर हजर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गुन्हा कितीही जुना असो, आरोपी कितीही काळ फरार राहिला किंवा कुठेही दडून बसला तरी कायद्याच्या प्रक्रियेपासून कायमस्वरूपी सुटका होत नाही, हा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. जुन्या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी आणि न्यायालयीन प्रक्रियेला टाळणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम बारामती शहर पोलीस स्टेशनकडून यापुढेही सातत्याने व अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

बारामती शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे दीर्घकाळ फरार राहून कायद्याला चकवा देता येतो हा गैरसमज पुन्हा एकदा खोटा ठरला असून, कायद्याच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणारी ही कारवाई ठरली आहे. फरार आरोपींचा पाठपुरावा कितीही कालावधीचा असला तरी तो थांबणार नाही आणि प्रत्येक आरोपीला कायदेशीर प्रक्रियेसमोर आणण्यासाठी बारामती शहर पोलीस कटिबद्ध असल्याचा संदेश या कारवाईतून अधोरेखित झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow