हातचलाखीने ५० हजार रुपयांना गंडवलं, वडगाव निंबाळकर पोलिसांनी दाखवला जेलचा रस्ता
आय मिरर
बँकेतून पैसे काढून घरी जात असताना नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीस बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. सरफराज मानू इराणी वय ५० वर्षे असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव असून तो सातारच्या लोणंद मधील रहिवासी आहे.
बँकेतून काढलेल्या नोटा खराब आहेत मी तुम्हाला बदलून देतो असं म्हणतं त्याने हातचलाखी करीत पन्नास हजारांना गंडा घातला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे सोमेश्वरनगर येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून दिवाळीच्या खरेदीसाठी ५५ हजार रुपये काढून घरी जात होते. बँकेत पैसे मोजत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन बसली होती.
त्यानंतर फिर्यादी हे पैसे घेऊन आपल्या गाडीवरून घरी जात असताना सदर व्यक्तीने काळ्या रंगाच्या मोपेडवरून येऊन फिर्यादी यांना थांबविले. तुमच्या खिशातील नोटा खराब असून त्याऐवजी मी तुम्हाला चांगल्या नोटा बदलून देतो, असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडील ५० हजार रुपयांची रक्कम हातात घेऊन नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून घटनास्थळावरून पलायन केले.
याप्रकरणी वडगांव निंबाळकर पोलिसांनी अहोरात्र तपास करून सरफराज मानू इराणी, वय ५० वर्षे, रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा यास अटक केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सादिक इनामदार हे करीत आहेत.
सदर गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस हवालदार नितीन तांबे, किरण शेलार, पोलीस शिपाई नरेंद्र यादव, आबा जाधव, निलेश जाधव, सचिन घाडगे, सूरज धोत्रे व विकास येटाळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
सणासुदीच्या काळात अनोळखी व्यक्तींकडून पैसे बदलून देणे, नोटा तपासून देणे अथवा इतर कोणत्याही बहाण्याने आर्थिक व्यवहार करण्यास सांगितल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
What's Your Reaction?