महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील : कृषिमंत्री भरणे
आय मिरर
महिलांना पुरुषांबरोबर स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी देशात महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र विधेयक आणले आहे आणि हे विधेयक आणणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. ज्या विधेयकाद्वारे आता महिलांना स्वतंत्र एक वेगळी ओळख मिळाली असून प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे यासाठी सरकारचा प्रयत्न असून भविष्यात यात जसा जशा सूचना येतील त्या प्रमाणे त्यात दुरुस्ती करण्याची राज्य सरकारची तयारी आहे असे प्रतिपादन यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पुण्याच्या इंदापुरात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 अंतर्गत नोंदणी केलेल्या महिलांना राज्य शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं आहे. इंदापूरच्या भरणेवाडी येथे प्रातिनिधिक स्वरूपात हा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी मंत्री भरणे बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्रीमंत ढोले, इंदापूर पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन लोंढे, उपसभापती जयकुमार कारंडे, इंदापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, राहुल जाधव,तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे,इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे, यांसह लाभार्थी महिला आणि शेतकरी वर्ग उपस्थित होता.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विधेयक शासनाने नुकतेच विधानसभेत मंजूर करून घेतले.सकाळी उठल्यापासून ते सायंकाळी झोपे पर्यंत सर्वाधिक कष्ट महिला करते,मात्र थोड्या महिलांच्या नावावर शेती असते.काही महिलांच्या तीन पिढ्या शेतात कष्ट करतात त्यांना महिला शेतकरी म्हणून ओळख निर्माण झाली पाहिजे. कृषिविभाग राज्य सरकारच्या योजना याचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने हे विधेयक आणले आहे.
राज्यात आज 64 लाख महिलांनी या प्रमाणपत्र मिळण्यासाठी नोंदणी केली आहे पुण्यातून 3 लाख तर एकट्या इंदापूर तालुक्यात 32 हजार महिलांनी यासाठी नोंद केली आहे.संसाराची तिजोरी महिला सक्षमपणे चालवत असते,आज दीपावली च्या मुहूर्तावर याचे वाटप होत आहे याबद्दल मी मुख्यमंत्री यांचे आभार मानतो.याचा जास्तीत जास्त फायदा महिलांनी घ्यावा शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करावी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रमाणपत्राच्या नोंदणीसाठी महिलांना मदत करावी.
आज इंदापूर तालुक्यात दुष्काळ पडला आहे,त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मदतीसाठी अग्रीम मदतीचा निर्णय घेतला.या राज्यात १ कोटी ५० हजार शेतकऱ्यांना ती मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. इंदापूर तालुक्यात ७१ हजार हून अधिक खातेदर शेतकरी आहेत.त्यांना ६० हजार १३२ शेतकऱ्यांना ३० कोटी पेक्षा जास्त रुपये इंदापूर तालुक्यात मिळणार आहेत.
ही दीपावली दुष्काळ असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने करत आहे,शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अडचणीची दुःखाची आहे.पूर्वी एनडीआरएफ चे नियम होते त्यात बदल केला आहे.पूर्वी मिळणाऱ्या मदतीत आता रक्कम वाढ करत आहे.मंत्रिमंडळ समोर हा विषय येईल,त्याला लवकरच मंजुरी मिळेल.
राज्यात आपण ३५ हजार गावांचा दुष्काळात समावेश असून १०० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.१ कोटी ४१ हजार ५३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान राज्यात झाले आहे.केंद्राकडे आपण मदत मागत आहे, कोणत्याही शेतकऱ्याला आपण वाऱ्यावर सोडणार नाही.खरीप वाया गेला रब्बी ची पिकाची स्थिती चांगली नाही.
आज दादा आपल्यात नाहीत परंतु ते असताना महायुती सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी देण्याचा निर्णय केला होता. त्यापैकी२० लाख ७२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे.मुख्यमंत्री पाणंद रस्ते असतील अनेक गोष्टी शेतकऱ्यांना आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत.हे नैसर्गिक संकट आहे सामोरे जायचे आहे शेतकऱ्याला विनंती आहे खचू नका.अडचणीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांसोबत आहे.आज आपल्यात दादा नाहीत,दादांचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस सुरू होत नाही,शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता आज आपल्यात नाही,त्याच्या विना ही दीपावली आपण करत आहोत.
कृषी मंत्र्यांनी जे महिलांसाठी विधेयक मंजूर केलं ती महिलांसाठी खूप कौतुकास्पद बाब आहे. या विधेयकामुळे पुरुष शेतकऱ्यांसोबत आता आम्हाला महिला शेतकरी ही एक वेगळी ओळख मिळाली अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली.
What's Your Reaction?