हा तर नाद खुळा ! नाव खुळे यानेच केले मालकाला खुळखुळा ; दत्ता सहा महिन्यांनी बारामती शहर पोलिसांच्या हाती
आय मिरर
हॉटेल मध्ये ग्राहकांची बनावट नावे नोंदवून आणि उधारी दाखवून 34 लाखांहून अधिक रकमेचा अपहार करणाऱ्या माळेगाव येथील दत्तात्रय पोपटराव खुळे यास बारामती शहर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. खुळे याच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकी संदर्भात गुन्हा दाखल होता. गेल्या सहा महिन्यांपासून खुळे हा पोलिसांना चकवा देत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर गुन्ह्यामध्ये आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून हॉटेल व्यवसायातील व्यवस्थापक म्हणून काम करताना ग्राहकांची बनावट नावे नोंदवून, उधारी दाखवून व आर्थिक व्यवहारात फेरफार करून तब्बल 34,33,393/- (चौतीस लाख तेहतीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपये) इतक्या रकमेचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने जाणीवपूर्वक फरार राहून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता.
तथापि, बारामती शहर पोलीसांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारांच्या जाळ्याचा प्रभावी वापर करून आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला व त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन कायदेशीर अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे “गुन्हेगार कितीही चतुर असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही” हा ठोस संदेश समाजात पोहोचला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत व तपास पथकातील सहा. पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांनी अत्यंत धडाडीने व समन्वयाने कामगिरी पार पाडून आरोपीस अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या कारवाईमुळे नागरिकांच्या मनात पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून, “कानून के हाथ लंबे होते हैं”, तसेच “पोलिसांच्या तावडीतून आरोपी उशिरा का होईना, पण सुटत नाही” या उक्तींना साजेशी प्रभावी कामगिरी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात आली आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपहार झालेली रक्कम व इतर पुरावे जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बारामती शहर पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा फसवणुकीची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा. बारामती शहर पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, न्यायासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहेत.
What's Your Reaction?