कुस्तीच्या आखाड्यात लाल मातीखाली दडलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी केला उघड
आय मिरर
बारामती शहरातील शिवाजीनगर कसबा परिसरातील एका कुस्तीच्या तालमीमध्ये लाल मातीखाली लपवून ठेवलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे.
पूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी काही व्यक्तींनी धारदार शस्त्रे गोळा करून गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्याची तयारी केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथकाने धाड टाकत चार धारदार लोखंडी कोयते व एक तलवार अशी एकूण पाच घातक शस्त्रे जप्त केली आहेत.
या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.अटक केलेल्या चार आरोपींविरुद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी व मोक्का सारखे गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.न्यायालयाने या अटक संशयित आरोपींना दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बारामती शहरातील खंडोबानगर, शिवाजीनगर, कसबा व परिसरात घडणाऱ्या मारामारी, धमकावणे, दहशत निर्माण करणे आणि बेकायदेशीर शस्त्रांच्या वापरासारख्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी बारामती शहर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
याच मोहिमेदरम्यान दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजीउपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य वसंतराव कदम यांना विश्वासू गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली. काही इसमांनी पूर्वीच्या वादातून कोणावर तरी हल्ला करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रे गोळा केली असून, ती जामदार रोड, कसबा, बारामती येथील शिवाजीनगर गणेश मंदिराशेजारील कुस्तीच्या तालमीत लपवून ठेवली असल्याची माहिती होती.
सदर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले.
पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित कुस्तीच्या तालमीमध्ये शोधमोहीम राबविली. यावेळी तालमीतील लाल मातीमध्ये लपवून ठेवलेले चार धारदार लोखंडी कोयते व एक तलवार अशी एकूण पाच शस्त्रे मिळून आली. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत कायदेशीर पंचनामा करून सदर शस्त्रे जप्त केली.
कुस्तीच्या सरावासाठी वापरल्या जाणाऱ्या तालमीमध्ये अशा प्रकारे घातक शस्त्रे लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाल्याने या शस्त्रांचा मूळ स्रोत, त्यांची साठवणूक आणि संभाव्य वापरामागील उद्देश याबाबत तपास सुरू करण्यात आला.
सदर कारवाईच्या अनुषंगाने पाच संशयित इसमांची चौकशी सुरू करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस शिपाई गिरीश गणपत नेवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील तपासादरम्यान उपलब्ध पुरावे, आरोपींच्या सहभागासंबंधी प्राप्त माहिती आणि अटकेची कायदेशीर आवश्यकता विचारात घेऊन चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या पूर्व गुन्हेगारी अभिलेखांची माहिती प्राप्त केली असता त्यांच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, मारहाण, धमकी तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची नोंद आढळून आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल ,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य वसंतराव कदम तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनच्या प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती मनीषा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री. टेळकीकर, पोलीस हवालदार श्री. रामचंद्र शिंदे, पोलीस हवालदार श्री. अभिजीत एकशिंगे, पोलीस शिपाई श्री. गिरीश गणपत नेवसे, पोलीस शिपाई श्री. सादिक काझी व पोलीस शिपाई श्री. अक्षय सिताफ यांनी सहभाग घेतला. गुन्हा नोंदणीची कार्यवाही पोलीस हवालदार श्री. बनसोडे, बक्कल क्रमांक १९३५, यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. सर्जेराव पुजारी करीत आहेत.
What's Your Reaction?