मोठी बातमी | मेफेंटरमाईनचं घातक व्यसन लावणाऱ्या रॅकेटचा बारामती पोलिसांकडून पर्दाफाश,90 बाटल्यांचा साठा जप्त

Jun 6, 2025 - 07:55
 0  1359
मोठी बातमी | मेफेंटरमाईनचं घातक व्यसन लावणाऱ्या रॅकेटचा बारामती पोलिसांकडून पर्दाफाश,90 बाटल्यांचा साठा जप्त

आय मिरर 

बारामती शहर पोलिसांनी मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनचा अवैध साठा पकडलाय. बारामती शहरातील भिगवण रोडवरील ईलाईट जिम समोर उभ्या असलेल्या एका क्रेटा कारमधून पोलिसांनी मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या तब्बल 90 सिलबंद बाटल्या हस्तगत केल्या आहेत. व्यायाम शाळेत शरीरसौष्ठव करणाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याचा संशय होता, त्यातूनच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात देखील घेतला आहे.तन्मय कल्याण बनकर रा. सहयोग सोसायटी समोर बारामती याला ताब्यात घेतलं आहे तर त्याचा मित्र राहुल उघाडे हा फरार झाला आहे.

बारामती शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल 29 हजार 184 रुपये किमतीच्या मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन च्या 90 सीलबंद बाटल्या आणि 5 लाख रुपये किमतीची एक चार चाकी कार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी जप्त केलेली इंजेक्शन संबंधित व्यक्तीने कोठून आणली ? कोणत्या उद्देशाने आणली? तो कोणाला इंजेक्शनचा पुरवठा करणार होता? या रॅकेटमध्ये आणखीन कोण कोण सहभागी आहे ? याची कसून चौकशी आता बारामती शहर पोलीस करत आहेत.

बारामती शहरातील काही व्यायामशाळा मध्ये शरीरसौष्ठव करणाऱ्या तरुणांना भूलशास्त्रज्ञ प्रसूतीच्या वेळी वापरतात ते मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन घेण्यासाठी काहीजण प्रोत्साहित करतात अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. मात्र ठोस असा कोणताही पुरावा समोर येत नव्हता अखेर या प्रकरणाची आता बारामती शहर पोलिसांनी भांडाफोड केली आहे. 

बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील भिगवण रोडवरील असणाऱ्या ईलाईट जिम समोर समोरील सर्विस रस्त्यावर एक हुंडाई क्रेटा कार नंबर MH 14 JA 0901 ही चार चाकी उभी होती. पोलिसांना या संदर्भातील थोडीशी कुणकुण लागल्यामुळे पोलिसांनी संबंधित गाडीतील इसमाला नाव पत्ता विचारला असता त्याने तन्मय कल्याण बनकर रा. सहयोग सोसायटी समोर बारामती असं सांगितलं. याच दरम्यान त्याचा सहकारी मित्र राहुल उघाडे हा चकवा देऊन फरार झाला.

पोलिसांच्या पथकाने संबंधित कारची तपासणी केली असता या गाडीमध्ये पोलिसांना तब्बल मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या तब्बल 90 सिलबंद बाटल्या आढळून आल्या. हा सर्व अवैध साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे.

मेफेंटरमाईन (mephentermine sulphate) या इंजेक्शन चा वापर भूलशास्त्रज्ञ प्रसूतीच्या वेळी करतात. पण राज्यात ग्रामीण व शहरी भागात व्यसन म्हणून आणि शरीरसौष्ठव करणारे युवक सर्रास पणे हे इंजेक्शन वापरतात त्यांना त्यासाठी प्रोत्साहित केलं जातं अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. पण याबाबत ठोस असं काही समोर येत नव्हतं. अखेर बारामतीत एका व्यायाम शाळेसमोर उभा असलेल्या कारमधून पोलिसांनी हा अवैद्य औषधांचा साठा हस्तगत केल्याने याला आता दुजोरा मिळाला आहे.

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून BNS123,125,278,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास बारामती पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील फौजदार सतीश राऊत, रत्नदीप भंडारे, अमीर शेख, अभिजीत कांबळे, रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, जितेंद्र शिंदे, अक्षय सीताफ, सागर जामदार, दत्तात्रय मदने व अमोल देवकाते यांच्या पथकाने केली.

इंदापूर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवणे गरजेचे...

बारामती शहर हे शिक्षित आणि प्रगत शहर आहे मात्र अशा शिक्षित शहरात जर या पद्धतीने औषधांचा गैरवापर होत असेल तर इंदापूर सारख्या मोठ्या शहरापर्यंत हे लोन केव्हाच पोहोचलेलं असावं अशी शक्यता आता नाकारता येत नाही. इंदापूर शहरात अनेक मोठमोठ्या व्यायामशाळा कार्यरत आहेत. हजारो तरुण या ठिकाणाला जोडले गेले आहेत. त्यामुळे आता केवळ बारामतीची घटना आहे म्हणून त्याकडे कानाडोळा करण्यापेक्षा इंदापूर पोलीस किंवा इंदापूर तालुक्यातील इतर पोलीस ठाण्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात या इंजेक्शनचा होणारा गैरवापर वेळीच रोखण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवणे गरजेचे आहे तरच हे रॅकेट थांबू शकत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow