अल्पवयीन मुलीच्या गर्भपाता प्रकरणी फलटणच्या डॉक्टरला अटक
आय मिरर
बारामती मधील वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना मागील काही दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणात 24 एप्रिल 2026 रोजी वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता आणि रवींद्र आनंदराव गार्डी या आरोपीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र पोलीस कोठडीत असतानाच रवींद्र गार्डी याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आता या प्रकरणात फलटणमधील डॉक्टर योगेश हनुमंत नरुटे याला देखील वडगाव निंबाळकर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी अटक केली आहे.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी आज संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयाची झाडझडती देखील घेतली असून या गर्भपात प्रकरणी वापरण्यात आलेले साहित्य याशिवाय रुग्णालयातील काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
संबंधित डॉक्टरने मुलगी अल्पवयीन माहित असताना देखील तिचा गर्भपात केला यासंदर्भात पोलिसांना खबर देणे आवश्यक होतं मात्र दिली नाही गर्भपात करून तिच्या गर्भाची विल्हेवाट लावली पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे आरोप डॉक्टर वरती ठेवण्यात आले आहेत.
याशिवाय या प्रकरणात पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ याच्या मदतीने फलटणमधील डॉक्टरच्या रुग्णालयात संबंधित पीडित मुलीचा गर्भपात केल्या प्रकरणी पोलिसांनी पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ याला देखील आरोपी करत अटक केली आहे.
काय आहे प्रकरण...
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील एका 48 वर्षीय पुरुषाने लैंगिक अत्याचार केला होता. यातून संबंधित पीडित मुलगी गर्भवती राहिली. पीडित मुलगी आणि आरोपी हे नात्यातील असल्याने हे प्रकरण समझोता करून गर्भपात करून मिटवण्याचा प्रयत्न झाला.
मात्र या प्रकरणाचा पुढे उलघडा झाल्यानंतर संबंधित आरोपीला काही स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.पुढे या प्रकरणात पोलिसांनी संबंधित पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी संबंधित प्रकरणातील आरोपी रवींद्र आनंदराव गार्डी याला अटक देखील केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली असताना 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीतच पांघरण्यासाठी दिलेल्या चादरीच्या मदतीने रवींद्र गार्डी याने आत्महत्या केली.
यानंतर या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असताना संबंधित पीडित अल्पवयीन मुलीचा गर्भपात घडवून आणण्यात मध्यस्थी केलेल्या पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ याच्यावर देखील पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
तर फलटणमधील ज्या डॉक्टरच्या रुग्णालयात या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला त्या डॉक्टरला देखील या प्रकरणात दोषी ठरवत त्याच्यावर देखील पोलिसांकडून कारवाई करत डॉक्टरला अटक करण्यात आली. पोलिसांनी डॉक्टरच्या रुग्णालयाची झाडाझडती घेत काही महत्वाची कागदपत्रे आणि गर्भपात प्रकरणी वापरलेले काही साहित्य हस्तगत केले आहे.
What's Your Reaction?