तो म्हणाला 'जंगल भी अपना और कानून भी अपना' मग सुपा पोलिसांनी अशी केली खातिरदारी
आय मिरर
इंस्टाग्रामवर लाईक व्ह्यूज आणि फॉलोवर्स मिळवण्यासाठी हातात घातक शस्त्र घेऊन रिल्स बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडल आहे. बारामती तालुक्यातील सुपा पोलिसांनी याची गंभीर दखल घेत या तरुणावर थेट गंभीर शस्त्रास्त्र कायद्यासह स्वरूपाचा गुन्हा दाखल केलाय. प्रेम प्रताप जगताप राहणार बाबुर्डी असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाच नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल आहे.
सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे यांनी दिलेल्या माहितीनुसार,सुपा पोलीस ठाण्याचे 'सायबर मॉनिटरिंग' पथक गस्तीवर असताना, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी 'prem_jagtap_0295' या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या व्हिडिओमध्ये बाबुर्डी (ता. बारामती) येथील रहिवासी प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन व्हिडिओ पोस्ट केल्याचे आढळून आली.सदर व्हिडिओवर "आलीशान युवा प्रतिष्ठान" असा मजकूर टाकून, "शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है" अशी प्रक्षोभक व धमकीवजा वाक्ये वापरण्यात आली होती.
तसेच, या व्हिडिओच्या ऑडिओमध्ये एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याचा संदर्भ देऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई...
सध्या पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांचे शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू आहेत. या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी, सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत इंस्टाग्राम अकाउंट धारक आरोपी प्रेम जगताप याच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
सदर तरुणावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३५१(२)(३), २२३, तसेच भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये अत्यंत कडक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस हवालदार रुपेश साळुंके, पोलीस शिपाई किसन ताडगे, पोलीस शिपाई महादेव साळुंके व पोलीस शिपाई भाऊसाहेब चौधरी यांच्या पथकाने केली आहे.
रिल्स साठी 'रिअल' लाईफ संपवू नका...
सोशल मीडियावर खोटा रुबाब दाखवण्यासाठी हत्यारांचे प्रदर्शन करणे हा अत्यंत गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे.
एक चूक आणि करिअर कायमचे उद्ध्वस्त अशी वेळ तुमच्यावर येऊ शकते. गुन्हा दाखल झाल्यास 'पोलीस चारित्र्य पडताळणी' मिळू शकत नाही. त्यामुळे सरकारी/खासगी नोकरी आणि पासपोर्टचे दरवाजे कायमचे बंद होतील. तरुणांनी स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असून, आभासी दहशत माजवाल तर कोणतीही गय न करता थेट कारवाई केली जाईल असा इशारा मनोजकुमार नवसारे यांनी दिला आहे
What's Your Reaction?