Baramati सरकारी नोकरीच आमिष, कोट्यावधींना गंडा ! पोलीस निरीक्षक यादवांनी आत्तापर्यंत तिघांना दाखवला जेलचा रस्ता

May 26, 2026 - 21:53
May 26, 2026 - 21:57
 0  103
Baramati सरकारी नोकरीच आमिष, कोट्यावधींना गंडा ! पोलीस निरीक्षक यादवांनी आत्तापर्यंत तिघांना दाखवला जेलचा रस्ता

आय मिरर 

शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीवर बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

बनावट नियुक्तीपत्रे देऊन तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या या टोळीतील आणखी एका आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी गजाआड केल आहे.

सुरज तिमयया असदकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

या प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी आतापर्यंत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वीच दौंड येथील अजिंक्य पाठक आणि येरवडा येथील सुधाकर सोळंकी यांना अटक केली असून या दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ ते ४ मे २०२५ या कालावधीत तांदुळवाडी (ता.बारामती) येथील महिला हॉस्पिटल तसेच मळद परिसरात वैद्यकीय सेवेत असलेला आरोपी अनिकेत धनंजय पाठक याने 'गट-क अधिपरिचारिका' पदावर शासकीय नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत महिला हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स व इतरांची ओळख करून घेतली. 

त्यानंतर अजिंक्य पाठक, सिओना साळवे उर्फ सिओना अनिकेत पाठक, सुधाकर सोळंकी, सागर गायकवाड आणि सुरज असदकर यांच्या मदतीने फिर्यादी व साक्षीदारांकडून वेळोवेळी ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपये उकळण्यात आले. विशेष म्हणजे, विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी बनावट नियुक्तीपत्रेही दिली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये मार्च २०२६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी सुरज तिमयया असदकर हा चिंचवडगाव येथील घरी पत्नीला भेटण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आर्थिक फायद्यासाठी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीस ६ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

यापूर्वी अजिंक्य पाठक राहणार दौंड आणि सुधाकर सोळंकी राहणार येरवडा यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांच्यासह पोलीस अंमलदार सागर देशमाने जितेंद्र शिंदे विठ्ठल तरंगे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow