भिमा नदीच्या पात्रातील मच्छीमारांच्या बोटींचे इंजिन चोरणाऱ्या दोघांना अटक ; भिगवण पोलीसांची कामगिरी

आय मिरर (निलेश मोरे)
भिमा नदीच्या पात्रात मासेमारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मच्छीमारांच्या बोटींचे इंजिन चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना भिगवण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 बोट इंजिन, एक लोखंडी बोट व इतर साधणे असा 8 लाख 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.
दत्तु हिरामन घटे, (वय- 38), रमेश हिरामन गव्हाणे, (वय 37), रा. दोघेहीवरखडे, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सी.सी.टी.व्ही. फुटेज, जी.पी.आर.एस व गोपनिय बातमीदार यांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभारगाव, धुमाळवाडी, (ता. इंदापुर) गावच्या हद्दीतुन भिमा नदीच्या पात्रामध्ये अनिल नामदेव धुमाळ, (रा. कुंभारगाव, ता. इंदापुर) यांच्या मालकिची मासेमारी करण्यासाठी वापरणारी होंडा कंपनीची 5 एच.पी 160 सी.सी बोटचे इंजीन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरू नेल्याची घटना सोमवारी (ता. 27) सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी धुमाळ यांनी भिगवण पोलीस ठाण्यात इंजीन चोरी झाल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दिली होती.
सदर घटनेचा भिगवण पोलीस तपास करीत असताना सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज, जी.पी.आर.एस व गोपनिय बातमीदार यांच्या मदतीने माहीती काढुन दत्तु घटे व रमेश गव्हाणे यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर गुन्हे केल्याची कबुली दिली.
दरम्यान, सदर गुन्हयातील आरोपी यांच्याकडून चोरीस गेलेले 4 बोट इंजिन, 1 लोखंडी बोट व इतर साधणे असा 8 लाख 30 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे, पोलीस अंमलदार विठ्ठल वारगड, पांडुरंग गोरवे, सुभाष गायकवाड, प्रसाद पवार, सचिन पवार, रणजित मुळीक, यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार विठ्ठल वारगड करीत आहे.
What's Your Reaction?






