बिहारमध्ये एनडीएला यश ! महिलांच्या खात्यात पैसे टाकले : शरद पवारांची टीका
आय मिरर
बिहार निवडणुकीत महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये वाटपाच्या मुद्द्यावरून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर शंका उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केली. सरकारी निधी मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी वापरला गेला असेल, तर यामुळे लोकशाहीवरील विश्वास ढासळण्याची भीती आहे, असा इशारा त्यांनी दिला. शरद पवार हे आज बारामती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
पवार म्हणाले, बिहारच्या निकालावरून स्पष्ट होतं की महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग नोंदवला. महिलांच्या खात्यातील दहा हजारांच्या थेट लाभाचा परिणाम मतदानावर झाला का, हा गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्रातही निवडणुकांच्या आधी शासकीय स्तरावर आर्थिक लाभ वाटपाचे प्रयोग झाले असल्याची आठवण त्यांनी करून दिली.
“सरकारी खजिन्यातले पैसे मतदान साधण्यासाठी वापरणे हा सरळ गैरमार्ग आहे. निवडणूक आयोगाने या पद्धतीला तातडीने रोखण्यासाठी मार्गदर्शक नियम केले पाहिजेत.”
त्यांनी स्पष्ट केलं की, बिहारमध्ये पैसे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी वाटले गेले, त्यामुळे कारवाईचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे, परंतु हे योग्य असल्याचे म्हणता येणार नाही.
मुंबई महापालिका व स्थानिक स्वराज्य निवडणुका...
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर पवार म्हणाले,“घेतील, न घेतील माहित नाही… पण यात नवल काही नाही.”तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या दोन गटांची संभाव्य युतीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्थिती पाहून निर्णय जिल्हा पातळीवर घेतला जाईल.
केळीचे दर, ऊस दर कोंडी आणि इतर प्रश्न...
केळीचे दर घसरल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात वाढवण्याबाबत प्रयत्न करू.ऊस दरातील मतभेदांवर भाष्य करताना ते म्हणाले,“साखरेचा भाव न वाढवता ऊस भाव वाढवणे शक्य नाही; आंदोलनामुळे ट्रॅक्टर अडवणे म्हणजे नुकसानच आहे.”
शिवसेना चिन्हाच्या निकालात विलंब...
शिवसेनेच्या चिन्हासंदर्भातील निर्णय वारंवार पुढे ढकलला जात असल्याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त करत “ही त्यांची कायदेशीर मागणी आहे, उशिर झाला तर पक्षाला त्याची झळ बसणारच.” असं म्हणत चिन्हा बाबत लवकर निर्णय व्हायला पाहिजे असे म्हटले आहेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवर त्यांनी निवडणूक आयोगाबाबत चिंता व्यक्त केली
“निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे. लोकांच्या मनात शंका वाढत आहे, ही स्थिती चिंताजनक आहे.” अस ही शरद पवार यांनी म्हटले आहे.
What's Your Reaction?