स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : नगराध्यक्ष भरत शहा

May 13, 2026 - 07:25
May 13, 2026 - 07:28
 0  58
स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : नगराध्यक्ष भरत शहा

आय मिरर 

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेला इंदापूर नगरपरिषदेने जोरदार सुरुवात केली असून, शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासनाने विविध स्तरांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. या अभियानात नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले आहे.

शहरातील प्रत्येक नागरिकाने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून तो घंटागाडीतच टाकावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये, तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. नागरिकांच्या सहभागातूनच शहराला स्वच्छतेत मानाचे स्थान मिळू शकते, असा विश्वास नगराध्यक्ष भरत शहा यांनी व्यक्त केला.

इंदापूर शहराने यापूर्वीही स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. तत्कालीन नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या कार्यकाळात इंदापूरकरांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून इंदापूर शहराला देशपातळीवर तब्बल २२ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. या निधीतून शहरातील विविध विकासकामांना गती मिळाली होती. रस्ते, स्वच्छता सुविधा, सार्वजनिक आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांच्या उभारणीत या निधीचा मोठा उपयोग झाला होता.

यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेतही इंदापूर शहराने उत्कृष्ट कामगिरी करावी आणि देशपातळीवर पुन्हा एकदा मानाचे स्थान मिळवावे, यासाठी नगरपरिषदेने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. विविध भागात स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात असून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. व्यापारी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचतगट आणि विद्यार्थ्यांनीदेखील या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वच्छ शहर हीच खरी प्रगतीची ओळख असून, प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात करणे आवश्यक आहे. माझे शहर, माझी जबाबदारी, ही भावना मनात ठेवून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास इंदापूर शहर निश्चितच स्वच्छतेत आदर्श ठरेल, असा विश्वास नगराध्यक्ष भरत शहा यांनी व्यक्त केला.

नागरिकांनी स्वच्छता अभियानाला सहकार्य करावे...

इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास आणि स्वच्छतेत देशपातळीवर मानाचे स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच टाकावा, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करू नये आणि स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. स्वच्छ इंदापूर हीच आपल्या शहराच्या प्रगतीची खरी ओळख ठरेल. 

नागरिकांच्या सहकार्यामुळेच इंदापूर स्वच्छतेत अग्रेसर ...

इंदापूर शहरातील नागरिक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, तसेच सर्व नगरसेवक यांनी यापूर्वीही स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केले आहे. यंदाही सर्वजण मोठ्या जबाबदारीने कार्य करत आहेत. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदापूरने पुन्हा देशपातळीवर मानाचे स्थान मिळवावे, यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow