शाब्बास पोलीस ! सुपा पोलिसांनी असं काम केलं ज्याची सर्वत्र चर्चा झाली ; वाचा सविस्तर नक्की काय घडलं
आय मिरर
बारामती तालुक्यातील सुपा येथील पीडीसीसी बँक परिसरात भरतगाव येथील शितल विकास टेमगिरे या महिलेचे अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हरवले होते, सुपा पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवत केवळ १२ तासांत हरवलेले मंगळसूत्र शोधून त्या महिलेस परत केल्याने पोलिसांच्या कार्याचे कौतुक होतय.
सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याच्या दौंड तालुक्यातील भरतगाव येथील शितल टेमगिरे या १३ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास सुपा येथील पिडीसीसी बँक परिसरात असताना त्यांच्या गळ्यातील तब्बल एक लाख 50 हजार रुपये किमतीचे सव्वा तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाले.
गळ्यातील मंगळसूत्र हरवल्याचं लक्षात येताच शितल टेमगिरे या अस्वस्थ झाल्या त्यांनी शोध घेतला मात्र त्यांना ते मिळून आलं नाही.
आपलं मंगळसूत्र सापडत नाही हे लक्षात आल्यानंतर शितल टेमगिरे यांनी तात्काळ सुपा पोलीस ठाण्यात जाऊन घडला प्रकार मनोजकुमार नवसरे यांच्या कानावर घातला. पोलीस अधिकारी नवसरे यांनी या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल किसनराव ताडगे, पोलीस कॉन्स्टेबल महादेव साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली.सखोल तपास आणि शोधकार्यादरम्यान सदर मंगळसूत्र एका महिलेस मिळून आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित महिलेकडून मंगळसूत्र ताब्यात घेऊन ते मूळ मालक शितल विकास टेमगिरे यांना सुपूर्द करण्यात आले.
हरवलेले सव्वा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र अल्पावधीत सुपा पोलिसांनी शोधून दिल्याने शितल विकास टेमगिरे यांनी सुपा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केलेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड तसेच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल किसनराव ताडगे, पोलीस कॉन्स्टेबल महादेव साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब चौधरी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
या सर्व प्रसंगावरून सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.कोणतीही मौल्यवान वस्तू हरवल्यास किंवा सापडल्यास अथवा कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ सुपा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, याची पोलिसांना कल्पना द्यावी आणि पोलीस खात्याला मदत करावी.
What's Your Reaction?