बिग बेकिंग | इंदापुरात राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्षांच्या विरोधाला डावलून भरत शहांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी !
आय मिरर
इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भरत शहा यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मुदत संपण्याच्या आत भरत शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांसह इतर नेते मंडळींच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करीत आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कोणाला उमेदवारी देणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागलं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून यावरती शिक्कामोर्तब झाले असून भरत शहा यांना इंदापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे जिल्हाध्यक्ष गारटकर यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना अजित पवार गटात घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यास अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. असं असताना ही पक्षाने जिल्हाध्यक्ष गारटकर विरोधी भूमिका घेत भरत शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कायम केली आहे.आज भरत शहा यांनी इंदापूर नगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांच्यासह इंदापूरच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी विरोधी पक्षनेते पोपट शिंदे,माजी नगरसेवक गजानन गवळी,स्वप्नील राऊत, बापूराव जामदार, संजय दोशी, शहा कुटुंबातील प्रमुख मुकुंद शहा, अंगद शहा, वैशाली शहा यांसह इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहा यांनी पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.
जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या भूमिकेकडे लक्ष...
इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर आणि त्यांच्या समर्थकांचा प्रचंड विरोध आहे.
नगराध्यक्ष पदाचा हा तिढा सोडवण्यासाठी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यात दोन दिवसापूर्वी बैठक पार पडली. मात्र या बैठकीत देखील जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या इच्छेप्रमाणे तोडगा निघाला नाही. त्यानंतर जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी इंदापूर मध्ये त्यांच्या निवासस्थानी दाखल होत कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
या बैठकीत जर पक्षाने गारटकर समर्थक विरोधी भूमिका घेतली तर मात्र आपल्या पदाचा राजीनामा देऊ आणि इंदापूर मध्ये स्थानिक आघाडी करून नगर परिषदेची निवडणूक लढवू असा पवित्रा गारटकर आणि त्यांच्या समर्थकांनी घेतला. एकूणच नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावरून गारटकर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची तयारी देखील दर्शवली आहे.
जर पक्षाने आपल्या विरोधी निर्णय घेतला तर स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देऊ.जर पक्षाने आमचं ऐकलं,योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळा वरती आहोत पक्षाने जर आम्हाला कोलल तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही.असा थेट इशाराच इंदापुरातून जिल्हाध्यक्ष गारटकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इंदापूरचे आमदार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलेला आहे.
एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर कोणती भूमिका घेणार ? पक्षाला सोडचिट्टी देणार की अन्य मार्ग अवलंबणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गारटकर पाटील माने आघाडीतून मंत्री भरणेंपुढे उभे केले जाणार आव्हान...
इंदापूर मध्ये शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते प्रवीण माने आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या स्थानिक आघाडीची चर्चा सुरू झाली असून इंदापूर मध्ये यातून एक नव समीकरण पाहायला मिळेल. गेले कित्येक वर्ष एकमेकांच्या विरोधात असलेले गारटकर आणि पाटील या नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत मानेंना सोबत घेत दत्तात्रय भरणे यांच्या समोर 2029 साठी मोठं आव्हान उभा करतील अशी चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे.
What's Your Reaction?