मोठी बातमी | भरदिवसा गोळीबार ; रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल काळे जागीच ठार
आय मिरर
शिरूर तालुक्यातील सरदवाडी घाटातील राजस्थान ढाब्यासमोर सोमवारी (दि.१) सायंकाळी झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेत रेकॉर्डवरील आरोपी विशाल काळे (वय ३०,रा. शिरूर) याचा मृत्यू झाला आहे.तर केदार झाडगे हा जखमी झाला. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून,पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार,सोमवारी सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान उमेश अनिल जगदाळे (वय २६),केदार झाडगे आणि विशाल काळे हे तिघेजण त्यांच्या ताब्यातील टोयोटा टायझर (क्र. एमएच-१२, एक्सक्यू-५१०४) या कारमधून न्हावरा बाजूकडून शिरूरकडे जात होते.सरदवाडी येथील राजस्थान ढाब्यासमोर आल्यानंतर न्हावरा फाटा बाजूकडून येणाऱ्या किया सोनेट (क्र. एमएच-१४,एलए ११२८) या कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर सोनेट कारमधून चार ते पाच अज्ञात व्यक्ती खाली उतरले आणि त्यांनी टोयोटा टायझरच्या पुढील काचेवर पिस्तुलने तब्बल चार राऊंड गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे टोयोटा कारमधील तिघेही बाहेर पडून जीव वाचवण्यासाठी पळू लागले.
दरम्यान,त्याच वेळी एका दुचाकीवरून दोन जण घटनास्थळी आले.त्यापैकी रेकॉर्डवरील आरोपी सनी यादव आणि त्याच्या साथीदारांनी पळणाऱ्या तिघांवर गोळीबार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या हल्ल्यात विशाल काळे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.त्याच्या चेहऱ्यावर व तोंडावर दगडाने मारहाण केल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.घटनास्थळी दोन रिकामे काडतुसे,चार ते पाच मोठे दगड आणि इतर महत्त्वाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.
या घटनेत केदार झाडगे हा जखमी झाला असून त्याच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर शिरूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उमेश जगदाळे हा हल्ल्यावेळी घटनास्थळावरून पळून गेला होता. नंतर तो पोलिसांसमोर हजर झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
हल्लेखोर हे एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहन घेऊन आले होते. गोळीबार आणि हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तसेच फॉरेन्सिक पथकालाही तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित सनी यादव (रा.बकोरी फाटा,वाघोली) याच्यासह अन्य पाच ते सहा साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत.मृत विशाल काळे तसेच संशयित सनी यादव हे दोघेही रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात असून, शिरूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
What's Your Reaction?