दोन वर्षापूर्वीच भांडण,गळ्यावर सपासप वार ! ३६ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश ; आठ जूनच्या पहाटे बाळासाहेबांसोबत काय घडलं ? 

Jun 10, 2026 - 21:52
Jun 10, 2026 - 21:57
 0  281
दोन वर्षापूर्वीच भांडण,गळ्यावर सपासप वार ! ३६ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश ; आठ जूनच्या पहाटे बाळासाहेबांसोबत काय घडलं ? 

आय मिरर 

शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर ओट्यावर निवांत झोपलेल्या इसमाचा मध्यरात्री धारदार कोयत्याने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे.

या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या ३६ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश करत आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

वरूडे येथील रानमळा परिसरातील बाळासो बबन तांबे (वय ४३) हे उकाड्यामुळे घराबाहेरील ओट्यावर झोपले होते. ८ जून रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करत त्यांची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तांबे यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी मयताच्या हालचाली, पूर्वीचे वाद, गावातील संबंध आणि संशयितांची माहिती तपासली. त्यावेळी गावातीलच एका अल्पवयीन मुलाचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याची पालकांसमक्ष चौकशी केली असता त्याने खुनाची धक्कादायक कबुली दिली.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवीगाळ व धमकीचा सूड मनात धरून त्याने हा खून केल्याचे तपासात समोर आले. राग अनावर झाल्याने झोपेत असलेल्या तांबे यांच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्यांचा जीव घेतल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी त्याच्याकडून खुनासाठी वापरलेला लोखंडी कोयता जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे व त्यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे.

वरूडे येथील खुनाने संपूर्ण परिसर हादरला असताना शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने दाखविलेली तत्परता विशेष ठरली. कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ तांत्रिक तपास, माहिती संकलन आणि बारकाईच्या चौकशीच्या बळावर पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत आरोपीपर्यंत मजल मारली.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांचेसह श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील जनार्धन शेळके, राजु मोमीन, तुषार पंदारे, संजू जाधव, सागर धुमाळ, शिकापुर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, अमोल नलगे, प्रतिक जगताप, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत यांच्या पथकाने केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow