त्यांच्या त्रासाला कंटाळून दहावीतील मुलीने संपवलं जीवन, बारामती तालुक्याला हादरविणारी घटना

Apr 11, 2025 - 15:52
Apr 11, 2025 - 15:54
 0  568
त्यांच्या त्रासाला कंटाळून दहावीतील मुलीने संपवलं जीवन, बारामती तालुक्याला हादरविणारी घटना

आय मिरर 

बारामती तालुक्यातील को-हाळे खुर्द येथील इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अंकिता कडाळे असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या विद्यार्थिनीने 8 एप्रिल 2025 रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिला काही दिवसांपासून विशाल दत्तात्रय गावडे आणि त्याचे मित्र प्रविण गावडे, शुभम गावडे व सुनील खोमणे यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे.

या संपूर्ण घटनेवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती तालुक्यातील को-हाळे खुर्द येथे दहावी मध्ये शिकत असणाऱ्या मुलीने विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती.

माझ्याशी जत्रेच्या अगोदर लग्न कर नाहीतर तुझ्या घरच्यांची मुंडके छाटून टाकेन अशी धमकी संबंधित मुलाने दिली होती. या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केली आहे. या संदर्भात आरोपी विशाल गावडे यास अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात असल्याचं राठोड यांनी सांगितलं आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की 16 वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती.

सात एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०७,७८,२९६,३५२, ३५१ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow