निरा बारामती मार्गावर टेम्पोचा रॉड तुटला, दुचाकीला ठोकलं ! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

Jun 4, 2025 - 20:27
Jun 4, 2025 - 20:29
 0  1951
निरा बारामती मार्गावर टेम्पोचा रॉड तुटला, दुचाकीला ठोकलं ! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

आय मिरर 

निरा-बारामती रस्त्यावरील सोरटेवाडी गावाच्या हद्दीत मालवाहू टेम्पोचा रॉड तुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि. ४ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचे नाव तय्यब रमजान शेख (वय ३२, रा. वाणेवाडी, ता. बारामती) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बाळासो जगताप (रा. मुढाळे, ता. बारामती) हा मालवाहू टेम्पो (क्रमांक: एम.एच. ४२ एक्यु ३७६०) घेऊन निरा बाजूकडून बारामतीच्या दिशेने जात होता. यावेळी टेम्पोचा रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्याच्या विरुद्ध दिशेला (रॉंग साइड) गेला.

त्याचवेळी बारामतीहून निराकडे जाणाऱ्या तय्यब शेख यांच्या मोटरसायकलला (क्रमांक: एम.एच. ४२ एक्स ४५७५) टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत तय्यब शेख गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघाताची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

टेम्पोचालक संजय जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी टेम्पो जप्त केला असून, रॉड तुटण्याचे नेमके कारण आणि चालकाच्या निष्काळजीपणाचा तपास केला जात आहे.या घटनेने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow