भिगवण पोलिसांनी पाच दिवस पाळत ठेवली पण शेवटी छोटू ताब्यात घेतलाच ! वाचा छोटू चा पराक्रम
आय मिरर
बाथरूमच्या पाईप वरून घराच्या टेरेसवर चढून घरफोडी करणारा अट्टल चोरटा पुण्याच्या भिगवण पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत मधून जेरबंद केला आहे.छोटु उर्फ अस्लम उर्फ राजु कुंडलीक म्हेत्रे असं या अट्टल गुन्हेगाराचे नाव असून तो लातूर जिल्ह्यातील आहे. त्याच्यावर यापूर्वी चोरीचे बारा गुन्हे दाखल आहेत.
भिगवण पोलिसांनी त्याच्याकडून सात तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने यासह 3 लाख 13 हजार 692 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय.भिगवण पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होतंय.
भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी भिगवण गावचे हद्दीत वार्ड क्रमांक चार मध्ये योगेश उर्फ पांडुरंग नामदेव जानराव यांच्या घरी भर दिवसा अज्ञात चोरट्याने घराच्या टेरेसवरून खिडकीची जाळी तोडून घराचा दरवाजा उघडला.
त्यानंतर तक्रारदारांच्या वडिलांना एका रूममध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर दुसऱ्या खोलीतील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा पाच लाख 44 हजार 332 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला.
सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी भिगवण पोलिसांनी पोलीस पथक रवाना केले. पोलीस पथकाने भिगवण परिसरामध्ये सुमारे 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले.त्यामधून .छोटु उर्फ अस्लम उर्फ राजु म्हेत्रे या संशयताला भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतलं. भिगवण पोलिसांनी त्याचा फोटो महाराष्ट्र क्राईम पोलीस ग्रुप वर प्रसारित केला. त्यानंतर .छोटु उर्फ अस्लम उर्फ राजु कुंडलीक म्हेत्रे हा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार असल्याचं समोर आलं.
आरोपी पुढे अन् पोलीस पाठीमागे...
सदर आरोपी हा सतत आपला ठिकाणा बदलत असल्याने आणि मोबाईल वापरत नसल्याने त्याला शोधणे हे भिगवण पोलिसांसमोर एक आव्हान होतं. प्रभारी अधिकारी विनोद महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील,पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे, योगेश कुलकर्णी यांच्या पोलीस पथकाने लातूर आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला. मात्र आरोपी हुशार असल्याने आरोपी पुढे अन् पोलीस पाठीमागे असा खेळ सुरू होता. शेवटी पोलीस पथकाने आरोपीवर पाच दिवस रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि लातूर या ठिकाणी पाळत ठेवली.
तपास पथकातील अंमलदार महेश उगले व संतोष मखरे यांनी आरोपीच्या घराच्या परिसरात सापळा लावून त्यास एक ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने भिगवण मध्ये केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पुणे ग्रामीण याचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, संतोष मखरे, योगेश कुलकर्णी, तुषार रायकर, संकेत जाधव, चेतन पाटील,दिपाली मोरे यांनी केली आहे.
What's Your Reaction?