इंदापुरात मंत्री भरणेंना धक्का ! ना तुम रोक सकोगे ना हम रुकेंगे..! माजी पंचायत समिती सदस्याच्या स्टेटस मुळे राजकारणात उडाली खळबळ

Jan 16, 2026 - 15:53
Jan 16, 2026 - 16:21
 0  3452
इंदापुरात मंत्री भरणेंना धक्का ! ना तुम रोक सकोगे ना हम रुकेंगे..! माजी पंचायत समिती सदस्याच्या स्टेटस मुळे राजकारणात उडाली खळबळ

आय मिरर 

आज पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकरता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.अद्याप पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करिता अधिकृतरित्या कोणाला उमेदवारी देण्यात आली याची घोषणा करण्यात आली नसली तरी इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालत होताना पाहायला मिळत आहे. 

राज्याचे कृषिमंत्री आणि इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांना इंदापूर मध्ये पहिला धक्का बसला असून माजी पंचायत समिती सदस्य सतीश उर्फ गोटू पांढरे यांनी आपल्या स्वतःच्या व्हाट्सअप स्टेटसला भाजपच्या पक्षाच्या चिन्हासह ना तुम रोक सकोगे ना हम रुकेंगे..!! असं स्टेटस ठेवल्याने इंदापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सतीश पांढरे हे उद्या आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत मुंबईत भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. 

सतीश पांढरे यांची भाजप कडून वडापुरी जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी निश्चित झाली असून पांढरे यांच्या इन्कमिंग मुळे भारतीय जनता पार्टीला वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटात तगडा उमेदवार मिळणार आहे. यातून इंदापूरच्या पूर्व भागात भाजपची ताकद वाढणार आहे. 

पूर्वीच्या काटी वडापुरी जिल्हा परिषद गटाची नवीन रचनेनुसार आता वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गट अशी निर्मिती झाली आहे. माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे हे वडापुरी पंचायत समिती गणा मधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडून आले होते. नव्याने रचना झालेला वडापुरी माळवाडी हा जिल्हा परिषद गट यावर्षीच्या निवडणुकीत सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. 

या जिल्हा परिषद गटातून सतीश पांढरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी सतीश पांढरे यांसह हजारो समर्थकांची होती, मात्र या मागणीचा विचार न झाल्याने अखेर सतीश पांढरे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची साथ सोडून भाजपाचे कमळ हाती घेणार आहेत. सतीश पांढरे यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थक भाजपमध्ये मुंबईत उद्या पक्षप्रवेश करणार आहेत.

धनगर समाजातील एक युवा आणि सर्वसामान्य कुटुंबातील चेहरा म्हणून सतीश पांढरे यांची ओळख असून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ही पांढरे यांची ओळख होती. पंचायत समिती सदस्य पदाच्या माध्यमातून पूर्वीच्या वडापुरी गणात सतीश पांढरे यांनी आपल्या विकासात्मक कार्यातून दबदबा निर्माण केला आहे. खेडोपाडी गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवत तरुणांच्या माध्यमातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी या परिसरातून सतीश पांढरे यांनी मोठे संघटन उभा केले होते.

सतीश पांढरे यांचे शहा महादेवनगर हे गाव आताच्या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या माळवाडी गणात येत असून या गणात देखील सतीश पांढरे यांचा मोठा जनसंपर्क आहे. तर तरुणांची फळी देखील पांढरे यांच्या सोबत जोडली गेली आहे. मात्र आता सतीश पांढरे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने हा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow