पोलिस व पत्रकारांच्या तत्परतेने प्रवासी महिलेला सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल असणारी बॅग मिळाली परत 

Feb 12, 2024 - 18:55
 0  325
पोलिस व पत्रकारांच्या तत्परतेने प्रवासी महिलेला सोन्याच्या दागिन्यांसह मुद्देमाल असणारी बॅग मिळाली परत 

आय मिरर      

पुण्याहून इंदापूरकडे एस.टी बसने निघालेल्या महिलेची प्रवासी बॅग इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह पत्रकारांच्या तत्परतेने बार्शी (जिल्हा सोलापूर) येथून परत मिळाली.विशेष बाब म्हणजे याबॅग मध्ये सोन्याच्या दागिन्यांसह असलेला मुद्देमाल परत मिळाला.यावेळी सबंधित महीलेने पोलिस तसेच पत्रकारांचे आभार मानले आहेत.   

याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार (ता.10) रोजी उषा प्रवीण जामधाडे (मूळ रा.मेहकर जि. वाशिम) या आपल्या आई सुधाबाई यांचेसह पुणे येथील भावाला भेटून इंदापूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या मुलगा पियूष यास भेटण्यासाठी दुपारी दोनच्या दरम्यान पुणे येथून बसने इंदापूर कडे निघाल्या होत्या.यावेळी दुर्दैवाने हडपसर ते यवतच्या दरम्यान त्यांच्या बसचा किरकोळ अपघात झाला यावेळी संबंधित बस चालक,वाहक यांनी प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये बसून देण्याची व्यवस्था केली.यावेळी जमदाडे या पुणे अहमदपूर (बस क्रमांक 3758 पूर्ण नंबर माहित नाही) यामध्ये बसल्या. त्यानंतर सदर बस पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली या ठिकाणी भोजनासाठी थांबली.त्यावेळी उषा जमधाडे व त्यांची आई या दोघेही बसमधून उतरल्या मात्र काही वेळातच बस तेथून मार्गस्थ झाली आणि त्या दोघी तेथेच राहिल्या. त्यांची बॅग मात्र बसमध्येच राहिली.यावेळी त्या दोघींना काय करावे काही सुचेना. त्यानंतर पाठीमागून आलेल्या बसने त्या इंदापूर बस स्थानक येथे आल्या मात्र बस स्थानकावर त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी इंदापूर पोलीस स्थानक गाठले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी यांनी त्यांना भिगवन पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याबाबत कळवले.यामुळे जमदाडे या तेथून अश्रू ढाळीत निघाल्या होत्या. योगायोगाने दैनिक सकाळचे इंदापूर प्रतिनिधी संतोष आटोळे हे दैनंदिन गुन्हे बातमीचा आढावा घेण्यासाठी पोलीस स्टेशन येथे येत होते तेव्हा जमदाडे या अश्रू ढाळीत असताना दिसल्याने त्यांना काय झाले आहे.याबाबत माहिती विचारून सदर प्रकार पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचेसमोर मांडला.    

यावर पोलीस निरीक्षक कोकणे यांनी तात्काळ इंदापूर बस स्थानक यांच्याशी संपर्क साधत सदर बस बाबत माहिती घेतली तसेच त्या बसचे चालक वाहक यांचे क्रमांक घेतले यावरून संपर्क साधला असता ती बस बार्शी बस स्थानक येथे पोहचणार असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर लगेचच गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सलमान खान यांना बोलावून बार्शी पोलीस स्थानकाशी संपर्क साधत माहिती घेतली.यावेळी सलमान खान यांनी आपल्या विभागाचे बार्शी पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहकारी यांना घडलेल्या प्रकाराबाबत कल्पना देत बस आली की बसची तपासणी करण्याबाबत कळविले.    

काही वेळात बस बार्शी बस स्थानक येथे पोहोचली तेव्हा संबंधित पोलीस कर्मचारी यांनी बसची तपासणी केली असता बॅग आढळून आली त्यांनी तात्काळ सदर बॅग ताब्यात घेत इंदापूर पोलीस स्टेशनला तशी कल्पना दिली. यावेळी सदर बॅग मध्ये सोन्याच्या दागिन्यांसह इतर मुद्देमाल असल्याचे सांगण्यात आले यावेळी पोलीस स्टेशनमध्ये हजर असलेल्या जमदाडे यांनी सुटकेचा निस्वास घेत आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे पोलीस नाईक सलमान खान व दैनिक सकाळचे प्रतिनिधी संतोष आटोळे यांचे आभार मानले.

प्रवासात काळजी घेणे आवश्यक..

बस, रेल्वे किंवा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनातून प्रवास करीत असताना प्रवाशांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या वस्तू संभाळणे आपली जबाबदारी आहे. बस बाबत चालक वाहक यांनीही जेवणासाठी बस थांबून मार्गस्थ होत असताना आपल्याबरोबर असलेले सर्व प्रवासी आले आहेत की नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.- सूर्यकांत कोकणे (पोलिस निरीक्षक इंदापूर)

सोन्याच्या दागिन्यासह बॅग मिळाली.

इंदापूर बस स्थानकावर आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र इंदापूर पोलिस स्टेशन येथे दैनिक सकाळ प्रतिनिधीचे सहकार्य आणि पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व पोलिस नाईक सलमान खान यांची तत्परता यामुळे बॅग मिळाली. रविवार (ता.11) रोजी सकाळी बार्शी येथे जाऊन बॅग ताब्यात घेतली.यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह सर्व मुद्देमाल मिळाला.याबद्दल इंदापूर पोलीस स्टेशन तसेच पत्रकार संतोष आटोळे यांचे मनःपूर्वक आभार मानते.- उषा जमधाडे (प्रवासी महिला)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow