निरगुडेतील शेतकरी भगवान खारतोडेंचे उपोषण 34 दिवसांनी मागे
आय मिरर(देवा राखुंडे)
इंदापूर तालुक्यातील भगवान खारतोडे यांनी निरगुडे तलाठी कार्यालयासमोर दि.12 फेब्रुवारी पासून इंदापूर तालुक्यातील बाजरी, कांदा, सोयाबीन व तूर आदी पिकांना पिक विमा मिळावा,दृष्काळ निधी करीता नुकसान भरपाईसाठी अर्ज भरुन घ्यावेत शिवाय दुष्काळ स्थिती पाहता तालुक्यात चारा छावण्या सुरु कराव्यात यासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु केले होते.शनिवारी दि.16 मार्च रोजी आंदोलनाच्या 34 व्या दिवशी त्यांच्या मागण्यांची दखल सरकारकडून घेण्यात आल्याने आ.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांनी लिंबु पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले आहे.त्यामध्ये त्यांच्या पत्नी पूनम खारतोडे यांनीही उपोषण सुरू केले होते. ते मागे घेतले होते. मात्र भगवान खारतोडे तब्बल ३४ दिवस उपोषणाला बसले होते.
याबाबत भगवान खारतोडे म्हणाले की,बाजरी, कांदा, सोयाबीन तूर या पिकांचा पिक विमा ६ कोटी ७७ लाख रुपये शेतक-यांच्या खात्यात जमा केले आहेत हा सर्वात मोठा विजय आहे. दृष्काळ निधीचे फाॅर्म भरून घेण्यास सुरुवात केली आहे.यासोबत निरगुडे येथील 1 कोटी 39 लाख रुपयांच्या हर घर जल योजनेची कार्यकारी अभियंता जि.प.पुणे यांनी त्रेयस्त समितीमार्फत चौकशी करणार असल्याचे लेखी पत्र दिले आहे.साखर कारखाने बंद झाल्यावर चारा छावण्या व चारा डेपो सुरू करणार असल्याने आ.भरणे यांनी आश्वासन दिल्याचे खारतोडे यांनी सांगितले. शिवाय निरगुडे येथे उपकेंद्रात प्रत्येक शुक्रवारी एक दिवस वरिष्ठ डाॅक्टरांची आरोग्य सेवा देण्याची मागणीही पूर्ण करण्यात आली आहे.
दरम्यान इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांसाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही शेतीच्या पाण्याची योजना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मार्गी लावले असून पालकमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी निधी दिल्याने ही योजना मार्गी लागण्यास मदत झाली आहे. या योजनेचे कामही सुरू झाल्याचे भरणे यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते मामासाहेब झगडे, इंदापूर शिक्षक पतसंस्थेचे सभापती सतीश दराडे, बारामती पंचायत समितीचे माजी सदस्य भारत गावडे, लिंबराज सोसायटीचे माजी अध्यक्ष अमर भोसले, सौरभ झगडे, संभाजी गोसावी, बबन सोनवणे, बापू खारतोडे, पोलिस पाटील ऋषिकेश पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
What's Your Reaction?