इंदापूरच्या गागरगाव, बिजवडी मधील घरफोडी शेळ्या चोरीचे सत्र थांबता थांबेना ; सततच्या चोरीच्या घटनांमुळे गावकरी संतप्त...
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील गागरगाव, बिजवडी मध्ये दिवसा घरफोडी व रात्रीच्या वेळी शेळी आणि बोकड चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत.नवनाथ कचरे याच्या घरातून चार लाख रुपये रोख रक्कम आणि १३ तोळे सोन्याचे दागिने तर नारायण वीर यांच्या घरातून एक लाख रुपये रोख रक्कम आणि ३ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत तर ३८ शेळी व बोकडांची चोरी झाली आहे.
अखेर संतप्त झालेल्या पीडित ग्रामस्थांनी इंदापूर पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करत तात्काळ या शेळी बकरी चोरांचा छडा लावण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षभरापासून या चोरीचे सत्र सुरू आहे.संबंधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. मात्र चोरीचे सत्र थांबता थांबत नाही. सततच्या चोऱ्यांमुळे परिसरात गागरगावमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी रात्रभर जागून काढत असून जनावरे गोठ्यात सुरक्षित नाहीत या भीतीने कोणीही शेतात थांबायला तयार नाही. गावातील महिला व लहान मुले दहशतीखाली असून, उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेळ्या गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
(BNS) कलम ३०५ (घरफोडी करून चोरी), कलम ३३१(४) (रात्री घरात घुसणे), कलम ३०३(२) (जनावरांची चोरी) व कलम ३(५) (संघटित टोळीने गुन्हा) अन्वये तात्काळ गुन्ह्यांची एकत्रित चौकशी करून चोरट्यांच्या टोळीचा शोध घ्यावा व गावात रात्रीची नियमित पोलीस गस्त सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
नवनाथ अर्जुन कचरे,नारायण गणपत वीर,हनुमंत गणपत सातव ,किरण दत्तात्रय शिंदे,गणेश अंकुश भोसले, नाना नामदेव भोसले यांसह ग्रामस्थांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.
What's Your Reaction?