सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी ! रोहित पवारांनी व्यक्त केली इच्छा
आय मिरर
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लवकरच होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया वरती पोस्ट करत दोन्ही राष्ट्रवादींना ही निवडणूक बिनविरोध करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
आर्थिक शिस्त आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या बाबतीत राज्यातील एक अग्रगण्य सहकारी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची लवकरच निवडणूक होऊ घातलीय. गेली अनेक वर्षे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याने साखर उद्योगात आपला एक स्वतंत्र असा ठसा उमटवलाय.
दुर्दैवाने अजितदादांना जाऊन एक वर्षही झालं नाही, अशा परिस्थितीत अजितदादांच्या कर्तृत्त्वाकडं आणि नेतृत्वाकडं पाहून या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने कार्यक्षम उमेदवार देऊन ही निवडणूक बिनविरोध करावी आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ज्याप्रमाणे कारखाना चालत होता त्याच पद्धतीने यापुढंही शेतकऱ्यांचं हीत डोळ्यासमोर ठेवूनच कारखाना चालवावा, अशी माझी व्यक्तीगत इच्छा आहे. असं रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शेवटी हे सहकार क्षेत्र असल्याने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी इथं राजकारण बाजूला ठेवलं तर उत्तमच आहे आणि हीच अजितदादांनाही खरी श्रद्धांजली ठरेल. दोन्ही राष्ट्रवादीतील नेते याचा गांभीर्याने विचार करतील, ही अपेक्षा ! असही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी रोहित पवार यांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून ही निवडणूक बिनविरोध करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
What's Your Reaction?