मोठी बातमी | पोलिस हवालदारावर ५ लाखांची लाच घेताना एसीबीचा सापळा ; महेश उगले रंगेहात सापडला
आय मिरर
झुंबा डान्स क्लास आणि जिमच्या संदर्भातील तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी ७ लाख रुपयांची लाच मागून, त्यातील ५ लाख रुपये स्वीकारताना बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.ही कारवाई ८ सप्टेंबर रोजी बारामती शहरातील माळेगाव रोड परिसरात करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
बारामतीत पोलिस हवालदाराला पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडलं आहे.महेश अंकुश उगले, वय ३६ वर्षे, असं या आरोपी पोलिस हवालदाराचं नाव आहे. तो बारामती तालुका पोलिस ठाण्यात नेमणुकीस असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रेसनोटमध्ये देण्यात आली आहे.
तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीचा झुंबा डान्स क्लास व जिमचा व्यवसाय आहे. या क्लासमुळे त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी आरोपी पोलिस हवालदाराने ७ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
यापूर्वी २ लाख रुपये स्वीकारल्यानंतर उर्वरित ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला.
८ सप्टेंबर रोजी बारामतीतील पी.डी.सी.सी. बँकेजवळ, माळेगाव रोड परिसरात आरोपी पोलिस हवालदाराने तक्रारदाराकडून ५ लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला पकडलं. ही कारवाई दुपारी सुमारे ३ वाजून २ मिनिटांनी करण्यात आली.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये बारामती शहर पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आरोपीला दुपारी ३ वाजून २ मिनिटांनी ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणातील आरोपी महेश अंकुश उगले, वय ३६ वर्षे पोलिस हवालदार, इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाणे मधून बदली होऊन बारामती तालुका पोलीस ठाण्यात सेवेत कार्यरत होते.
What's Your Reaction?