बारामतीतील अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उलगडले ; वाचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय

Aug 23, 2026 - 18:26
Aug 23, 2026 - 18:31
 0  2326
बारामतीतील अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उलगडले ; वाचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज काय

आय मिरर 

बारामती शहरातील रुई परिसरातील स्वामी समर्थ रेसिडेन्सीजवळ रविवारी सकाळी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाची ही मुलगी आहे. त्यामुळे ही घटना वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली.

सुरुवातीला ही हत्या की आत्महत्या, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील परिस्थिती आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. 

रात्री घरातून निघून गेली अन् पहाटे शोध सुरू...

पोलिसांच्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मुलीला कुटुंबीयांनी रागावले होते. त्यानंतर ती रागाच्या भरात घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी बराच वेळ परिसरात तिचा शोध घेतला; मात्र ती आढळून आली नाही.

रविवारी पहाटे सुमारे ३.४० वाजता कुटुंबीय पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. पुढे तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून BNS कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

रुई परिसरात सापडला मृतदेह...

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून शोध सुरू असतानाच डायल 112 पथकाला रुई हद्दीतील स्वामी समर्थ बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन नातेवाईकांकडून खातरजमा केल्यानंतर तीच हरवलेली मुलगी असल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक टीमसह डिटेक्शन ब्रँचच्या तीन पथकांना तपासासाठी पाचारण करण्यात आले.

टेरेसवर चप्पल ; CCTV मध्ये रात्री ९.५८ वाजता लिफ्टने वर जाताना दिसली...

तपासादरम्यान स्वामी समर्थ रेसिडेन्सीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेसची पाहणी करण्यात आली. टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळले. स्थानिक मुलांच्या मदतीने शिडीच्या सहाय्याने पोलिसांनी टेरेसवर प्रवेश केला असता, तेथे मयत मुलीची चप्पल आढळून आली.

याशिवाय इमारतीच्या लिफ्टजवळील CCTV फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये संबंधित मुलगी रात्री ९.५८ वाजता लिफ्टने वर जाताना दिसून आली आहे. या CCTV फुटेजमुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

शरीरावर जखमा ; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा...

मुलीच्या शरीरावर तोंडावर खरचटल्याच्या जखमा आढळल्या असून, डावा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृतदेह पालथ्या अवस्थेत आढळून आला.

दरम्यान, प्राथमिक तपास आणि घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे. मात्र, मृत्यूचे अंतिम कारण अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेले नाही.

मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

मोबाईल आणि कौटुंबिक वादाचाही तपास...

यापूर्वी पत्रकारांशी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी मुलीचा आईसोबत काहीतरी वाद झाल्यानंतर ती घरातून निघून गेल्याची प्राथमिक माहिती दिली होती. मुलीकडे स्वतःचा मोबाईल नसून ती आईच्या मोबाईलवरून एका मुलाशी बोलत असल्याची माहितीही तपासात समोर आली होती. संबंधित मुलाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची तपासणी सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले होते.

तसेच कुटुंबातील वाद, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इतर परिस्थितीजन्य पुरावे तपासले जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत करीत आहेत.

सध्या पोलिसांच्या प्राथमिक तपासात आत्महत्येचा निष्कर्ष समोर आला असला तरी शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील इतर पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे मृत्यूचे अंतिम कारण शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर रिपोर्टनंतरच स्पष्ट होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow