इंदापूर शाखेच्या अध्यक्षपदी अभिजित ठोंबरे तर सचिव पदी अतुल वणवे, पदभार स्वीकारताच केला हा संकल्प
आय मिरर
इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉक्टर अभिजित ठोंबरे तर सचिव पदी डॉक्टर अतुल वनवे यांची निवड करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच इंदापूर शाखेकडून 2026 27 या वर्षामध्ये संपूर्ण इंदापूर तालुक्यातील कर्करोग हद्दपार करण्यासाठी "कर्करोगावर एकच बाण,जनजागृती आणि वेळेवर निदान " ही मोहीम यशस्वीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा (वर्ष २०२६-२०२७) पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. शहरातील डॉ. नीतू मांडके आय.एम.ए. हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदापूर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ.अभिजित ठोंबरे तर सचिवपदी डॉ. अतुल वणवे यांनी त्यांच्या संपूर्ण टीमसह अधिकृतपणे पदभार स्वीकारला.यावेळी नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अभिजित ठोंबरे म्हणाले की,आय.एम.ए.च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना समाजाप्रति असलेल्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. एक संघटना म्हणून आम्ही ही सामाजिक जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडू. समाजातील अंतिम व वंचित घटकांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.
कर्करोगावर एकच बाण, जनजागृती आणि वेळेवर निदान ही प्रभावी टॅगलाईन घेऊन आगामी काळात कर्करोगाबाबत व्यापक जनजागृती व वेळेवर निदानासाठी विशेष मोहिमा राबवण्याचा आम्हा सर्वांचा मानस आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबवणे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दरी कमी करणे आवश्यक आहे. यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून दोन्ही घटकांमध्ये उत्तम संवाद प्रस्थापित केला जाईल.असे ही त्यांनी सांगितले.
वैद्यकीय क्षेत्रात आधुनिकतेचा अवलंब करण्यासाठी डॉक्टरांनी 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित सध्याच्या विविध कायद्यांमधील व्यावहारिक अडचणी व आव्हाने राज्य आय.एम.ए. आणि केंद्रीय आय.एम.ए. (IMA HQ) पर्यंत पोहोचवून त्यावर मार्ग काढावा, असे आवाहन डॉ. ठोंबरे यांनी मंचावरील मान्यवरांना केले.
या कार्यक्रमास डॉ. सुनील इंगळे सदस्य, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल व माजी अध्यक्ष, आय.एम.ए. पुणे,डॉ. अनिल पानसे मानद सचिव, I.M.A.M.S. सोशल सिक्युरिटी स्कीम,डॉ. संजय पाटील मानद सचिव, HBI, आय.एम.ए. मुख्यालय दिल्ली व माजी अध्यक्ष, पुणे आय.एम.ए., डॉ. राम अरणकर माजी अध्यक्ष IMAMS व संरक्षक, आय.एम.ए. इंदापूर आणि डॉ. अविनाश पानबुडे चेअरमन, आय.एम.ए. फाउंडेशन हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
यावेळी मावळते पदाधिकारी डॉ. अनिल शिर्के (माजी अध्यक्ष, आय.एम.ए. इंदापूर) आणि डॉ. सुधीर तांबिले (माजी सचिव, आय.एम.ए. इंदापूर) यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
आय.एम.ए. इंदापूर शाखेचे सर्व सदस्य, बाहेरील भागातून आलेले निमंत्रित पाहुणे व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला मोठी शोभा आली. संपूर्ण सोहळा अतिशय भव्य, नियोजनबद्ध आणि उत्कृष्टरित्या संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आय.एम.ए. लेडीज विंगच्या अध्यक्षा डॉ. कल्पना खडे व त्यांच्या संपूर्ण टीमने, तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकारी आणि आय.एम.ए. इंदापूर शाखेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
What's Your Reaction?