तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या विरोधात सर्वपक्षीयांचे रणशिंग ! २५ नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर मोर्चा; प्रदीप गारटकरांचा आक्रमक पवित्रा, प्रवीण माने यांचीही टीका

Nov 19, 2026 - 06:35
Nov 19, 2026 - 06:54
 0  16
तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या विरोधात सर्वपक्षीयांचे रणशिंग ! २५ नोव्हेंबरला तहसील कार्यालयावर मोर्चा; प्रदीप गारटकरांचा आक्रमक पवित्रा, प्रवीण माने यांचीही टीका

आय मिरर 

 इंदापूर तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, रयत शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत असल्याचा आरोप करत २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली. या वेळी तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका केली.

यावेळी भाजप नेते प्रदीप गारटकर, भाजप युवा नेते प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास शेळके, शिवसेना शिंदे गटाचे नितीन शिंदे, महादेव सोमवंशी, रयत शेतकरी संघटनेचे निलेश देवकर, भटक्या विमुक्त संघटनेचे तानाजी धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रवीण माने म्हणाले की, इंदापूर तहसील कार्यालयाच्या कारभाराबाबत तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता असताना सर्वसामान्यांची कामे रखडत आहेत.

तहसीलदार वगळता इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत आमची कोणतीही तक्रार नाही. तहसीलदारांच्या कामकाजाच्या पद्धतीविरोधातच सर्वपक्षीय नाराजी एकवटली आहे. हा कोणत्याही एका पक्षाचा लढा नसून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी उभारलेले आंदोलन आहे. आंदोलन होणे ही चांगली गोष्ट नाही. यामुळे इंदापूरचे नाव खराब होत आहे; मात्र नागरिकांची कामे व्हावीत यासाठी नाईलाजाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप नेते प्रदीप गारटकर यांनी अधिक आक्रमक भूमिका मांडताना हा इंदापूर तालुक्याच्या अस्मितेचा विषय असल्याचे सांगितले. सार्वजनिक जीवनात अनेक वर्षे काम करताना एखाद्या अधिकाऱ्याविरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी कधी पाहिल्या नाहीत. तहसीलदारांकडून नागरिकांचे प्रश्न समजून घेतले जात नाहीत, राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा अपमान केला जातो, असा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही असाच अनुभव येत असल्याचा दावा त्यांनी केला.

तहसील कार्यालयातील कथित गैरकारभारावर प्रश्न उपस्थित करताना गारटकर म्हणाले की, सध्या इंदापुरात पैसे टाकले तर काम होते, अशी परिस्थिती असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. न्याय देण्याच्या प्रक्रियेत दोन्ही बाजूंनी पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. गरीब नागरिकांची पिळवणूक झाल्यास त्यांच्यातील असंतोष वाढेल. प्रशासनाने गोरगरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक बदलीसंदर्भात दिलेल्या पत्राचाही त्यांनी उल्लेख केला. सामाजिक कार्यकर्त्यांचा कर्मचाऱ्यांना जाच होतो की वरिष्ठ अधिकाऱ्यांचा, असा सवाल उपस्थित करत नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात गैर काय, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, राज्यात युतीचे सरकार असतानाही इंदापूरमध्ये तहसीलदारांविरोधात आंदोलनाची वेळ येत असल्याबद्दल गारटकर यांनी अप्रत्यक्षपणे स्थानिक नेतृत्वावरही निशाणा साधला. केवळ भाजपचे सरकार असते तर मोर्चा काढण्याची वेळ आली नसती, अशी टीका त्यांनी केली.

प्रांताधिकार्‍यांनीच निवेदन स्वीकारावे...

२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, जिल्हाधिकारी अथवा प्रांताधिकारी यांनी उपस्थित राहून निवेदन स्वीकारावे, अशी मागणी गारटकर यांनी केली. तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते निवेदन देणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. सर्वसामान्य नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत आणि प्रशासनाने कार्यपद्धतीत सुधारणा करावी, या मागणीसाठी हा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow