Rana Suryavanshi राणा हल्ला प्रकरण दिसतं तेवढं सरळ आणि साधं नाही ; सतराशे साठ प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार ?
आय मिरर
पुण्याच्या बारामती मध्ये 18 ऑक्टोबर च्या रात्री उद्योगपती राणा सूर्यवंशी यांच्या वरती झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मोठा संशय व्यक्त केलाय. रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स हॅण्डल वरती एक पोस्ट केली आहे.
हे प्रकरण दिसतं तेवढं सरळ आणि साधं वाटत नाही तर सुरक्षा हा एक मोठा अँगल या प्रकरणाला असू शकतो.मग ही सुरक्षा बारामतीची की आणखी कुणाची ? असा थेट सवाल रोहित पवार यांनी या प्रकरणावरून व्यक्त उपस्थित केला आहे.
या घटनेतून कुणाकडून बारामतीला बदनाम करण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना ? हे देखील पोलिसांनी तपासलं पाहिजे.त्यामुळं या घटनेचा ३६० डिग्री अँगलने तपास करून यातील वास्तव समोर आणावं, अशी बारामतीकर म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती असल्याचा रोहित पवार यांनी म्हटलं आहे. एकूणच राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित झालेत.
आतापर्यंत चौघांना अटक....
दरम्यान या हल्ल्यात चैतन्य उत्तम बाबर याचा ही समावेश असल्याचं पोलीस तापासात उघड झालं आहे. राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात आतापर्यंत बारामती पोलिसांनी चौघांना जेरबंद केलं आहे. या प्रकरणामध्ये स्वप्निल भगवान कांबळे आणि चैतन्य उत्तम बाबर यांचा समावेश असल्याचं पोलीस तापासात उघड झालं आहे. पोलिसांनी स्वप्निल कांबळे आणि चैतन्य बाबर यांना अटक केली असून बारामती न्यायालयाने या दोघांनाही 26 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राणा यांचा वाहन चालक ज्ञानदेव शिंदे याला दोन लाख रुपयांची सुपारी दिल्या प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राणा यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या ज्ञानदेव शिंदे यानेच मारेकऱ्यांना ही सुपारी दिली होती. यावरून सध्या अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहेत.खरंच हा हल्ला झाला की हा एक प्लॅन होता अशी देखील चर्चा सध्या सर्व दूर सुरू असून पोलीस खात्याने या संदर्भात कसून तपास करावा आणि नेमकं सत्य काय आहे ते बाहेर आणावं,गृह खात्यानं या प्रकरणाची पाळेमुळे बाहेर काढावीत अशी देखील मागणी आता पुढे येऊ लागलेली आहे.
राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पार्थ वासुदेव अवथळे यासह एक विधी संघर्षग्रस्त बालक या दोन संशयितांना पुण्यातील कर्वेनगरमधून ताब्यात घेण्यात आलं. तत्पूर्वी पोलिसांचा मोर्चा थेट करमाळा येथील झोळ कुटुंबाकडे वळाला. भोंदू मनोहर भोसले प्रकरणात जेलमध्ये असलेला दत्तकला शिक्षण संस्थेचा अध्यक्ष रामदास झोळ याचा बंधू नवनाथ झोळ याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र तपासात हल्ल्याचे धागे धोरे भलतीकडेच पोलिसांना घेऊन जात होते. त्यामुळे झोळ कुटुंबाला पुन्हा सोडून देण्यात आलं.
दरम्यान पोलीस तपासात राणा यांच्यावरील हल्ल्याची दोन लाखांची सुपारी राणा यांचा वाहनचालक ज्ञानदेव शिंदे यानेच दिली होती हे पोलीस तपासात समोर आलं. विशेष म्हणजे ज्ञानदेव शिंदे हा गेल्या अनेक वर्षांपासून राणा सूर्यवंशी कडे वाहन चालक म्हणून काम करतोय. या हल्ल्यात केवळ ज्ञानदेव शिंदे हा एकटाच सहभागी नव्हता. तर मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानदेव शिंदे यांना ही रक्कम स्वप्निल भगवान कांबळे यांच्याकडे पोहोच केली. त्यामुळे या प्रकरणात आता स्वप्निल कांबळे याचाही समावेश झालाय.
आतापर्यंत या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली असली तरी देखील ही जाळ खूप मोठं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राणा सूर्यवंशी याच्या पाठीशी सावलीसारखे उभे असणाऱ्या त्याच्या मित्रांनीच राणा सूर्यवंशी याच्यावर हल्ल्याचा कट रचला अशी ही माहिती आता समोर आली आहे.राणा वरती हल्ला घडवण्यासाठी ज्या डिफेंडर गाडीमधून पैशाची देवाण-घेवाण झाली त्याच डिफेंडर गाडीमधून राणा सूर्यवंशीला हल्ल्याचा कट रचणाऱ्या त्याच्याच त्या तीन मित्रांनी बारामतीत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.विशेष म्हणजे पुढील उपचारासाठी पुण्यात रुबी हॉस्पिटलला दाखल करण्यात आल्यानंतर हेच कट रचणारे मित्र राणाची काळजी घेत होते.अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखीन खूप मोठी आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय.सध्या त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
या हल्ल्यावरून निर्माण झालेले काही प्रश्न....
या हल्ल्यावरून काही प्रश्न देखील आता निर्माण झाले आहेत. हल्लेखोरांना राणा सूर्यवंशी याच्यावर हल्ला करण्यासाठी राणा सूर्यवंशी यांच्याकडे चालक असणाऱ्या ज्ञानदेव शिंदे याने दोन लाख रुपयांची सुपारी दिली असं पोलीस तापासात समोर आलं.ज्ञानदेव शिंदे हा राणाकडे चालक म्हणून काम करतो तर मग त्याने दोन लाख रुपयांची सुपारी घेतली कशी ? जर दोन लाख रुपयांची सुपारी घेतली तर त्याने मालकाला ही गोष्ट का सांगितली नाही ? ज्ञानदेव शिंदे यांच्याकडे दोन लाख कुठून आले ? कोणी दिले ? पोलीस तपासात या हल्ल्यात स्वप्निल कांबळे चैतन्य बाबर यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झालं. एवढेच नव्हे तर राणा सूर्यवंशी याच्या जिवलग तीन मित्रांनी हा कट रचल्याची ही माहिती सूत्रांची माहिती आहे. पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्याच्या हद्दीत एका हॉटेल वरती या संपूर्ण प्रकरणाची डील झाली होती. याच सीसीटीव्ही फूटेज ही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
या कटामध्ये आणखीन कोण कोण सहभागी आहे ? मग राणा सोबत राहणाऱ्याच काही लोकांनी हा कट शिजवला का ? जर हा कट राणा सोबत राहणाऱ्या त्याच्याच मित्रांनी रचला तर त्याच नेमक कारण काय ? या प्रकरणात सुरुवातीला झोळ कुटुंब नेमकं का टारगेट करण्यात आलं ? झोळ कुटुंबाकडेच पहिली संशयाची सुई का वळाली गेली ? जर हा हल्ला राणा सूर्यवंशी सोबत राहणाऱ्यांनीच केला तर मग झोळ कुटुंब हे सुरुवातीपासून टार्गेट होतं का ? यासारखे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.याची खरी खुरी उत्तर शोधून काढणं हेच पोलिसांपुढे आता आव्हान असणार आहे.
What's Your Reaction?