भिगवण मध्ये उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाचा बुलडोझर...

Jan 3, 2026 - 18:58
Jan 3, 2026 - 19:01
 0  1233
भिगवण मध्ये  उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाचा बुलडोझर...

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात जलसंपदा विभागाने उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली आहे. उजनी जलाशयाच्या भूसंपादन क्षेत्रात बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून काहींनी व्यवसाय थाटले होते.या अतिक्रमणांबाबत संबंधित प्रशासनाकडून वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिसांकडे दुर्लक्ष करत अतिक्रमणात वाढ झाल्याने अखेर आज बुलडोझरच्या साहाय्याने धडक कारवाई करण्यात आली. 

भिगवण –राशीन रोडलगत करण्यात आलेल्या या कारवाईत वीटभट्या, घरे व दुकाने पाडण्यात आली.जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता नितीन मधुकर खाडे यांनी वारंवार नोटिसा दिल्यानंतरही अतिक्रमण हटवले गेले नाही. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्राचे संरक्षण आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,जलसंपदा विभागाचे मंत्री डॉ.श्री.राधाकृष्ण विखे पाटील (महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.सदरची कारवाई अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर श्री खांडेकर, कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन भिमानगर श्रीमती सुचिता डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता भीमा उपसा सिंचन उपविभाग क्रमांक चार नितीन खाडे यांच्यासह उपविभागीय स्तरावरील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

 

नितीन खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण येथील प्रवीण चौंडकर आणि श्री.भापकर यांच्याकडून उजनी जलाशयात निळ्या पूररेषेत प्रत्यक्ष भराव टाकून हे अतिक्रमण करण्यात आले होते. अतिक्रमण धारकांना प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण न करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या परंतु तरीदेखील त्यास न जुमानता संबंधितांनी या ठिकाणी अतिक्रमण सुरूच ठेवले.

यानंतर उपविभागीय अभियंता यांच्याकडून सर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात येऊन देखील अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण सुरूच ठेवले होते. यानंतर जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार शनिवारी तीन जानेवारी 2026 रोजी या अतिक्रमणावर जलसंपदा विभागाकडून बुलडोजर फिरवण्यात आला.उर्वरित अतिक्रमण धारकांनावर पुढील कारवाई लवकरच केली जाणार असून उजनी जलाशय लगतचे इतर सर्व अतिक्रमण देखील हटविण्यात येणार आहे. अशी माहिती उपविभागीय अभियंता नितीन खाडे यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow