वडापुरी गटात मातब्बर दिग्गजांत पहायला मिळणार चुरस ! उमेदवार निवडताना नेत्यांचा लागणार कस

Nov 1, 2025 - 10:04
Nov 1, 2025 - 17:22
 0  2103
वडापुरी गटात मातब्बर दिग्गजांत पहायला मिळणार चुरस ! उमेदवार निवडताना नेत्यांचा लागणार कस

आय मिरर

इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारं जोरात वाहत असून लवकरच निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. पुढील आठवडाभरात आचारसंहिता जाहीर होईल असा अंदाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.अनेक जिल्हा परिषद गट आणि गणांमध्ये काहींचा हिरमोड झाला आहे तर काही गटात मातब्बर दिग्गजांत चुरस पाहायला मिळणार आहे.

वडापुरी जिल्हा परिषद गटात ओबीसी-मराठा संघर्ष पहायला मिळणार असून हा गट सर्वसाधारण आरक्षित झाल्याने इथे अनेक दिग्गजांत चुरस पाहायला मिळत आहे.यात विद्यमान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.उमेदवार निवडताना नेत्यांचा मोठा कस लागणार आहे.

वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आरक्षण असून, माळवाडी आणि वडापुरी गण या दोन्हीही गणात सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. त्यामुळे या गटातील आणि गणातील लढतीकडे विशेष लक्ष असेल.

पूर्वीच्या असणाऱ्या वडापुरी काटी या जिल्हा परिषद गटात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित तांबिले हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाले होते.तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर पंचायत समिती करिता सतिश पांढरे यांचा विजय झाला होता. याच गटातून मागील निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुकीत असलेल्या हर्षवर्धन पाटील गटाच्या इंदापूर पंचायत समितीच्या माजी सभापती स्वाती बापूराव शेंडे या विजयी झाल्या होत्या.

आता मात्र या गट आणि गण रचनेमध्ये बदल झाला असून काटी लाखेवाडी असा स्वतंत्र जिल्हा परिषद गट झाला आहे.तर नवीन रचनेमध्ये या गटाचे रूपांतर वडापुरी माळवाडी असे झाले असून या गटात गटात अनेक दिग्गजांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषद गटात या गावांचा समावेश...

माळवाडी गणामध्ये कालठण नंबर दोन, माळवाडी, पिंपरी खुर्द, शिरसोडी, पडस्थळ, टाकळी, अजोती, सुगाव,शहा, सरडेवाडी, गोखळी, तरंगवाडी, तर वडापुरी गणात कांदलगाव, तरटगाव, हिंगणगाव, बाभुळगाव, भाटनिमगाव, गलांडवाडी नंबर दोन, अवसरी, बेडशिंगे, भांडगाव, वडापुरी या गावांचा समावेश आहे.

2017 ला अशी झाली होती लढत...

2017 च्या जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटातून काँग्रेस आय च्या चिन्हावर कांदलगाव मधील ऋतुजा रविंद्र पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान सदस्य अभिजित राजेंद्र तांबिले यांच्यामध्ये मुख्य लढत झाली होती यात अभिजित तांबिले विजयी झाले होते.

विकास कामांचा दबदबा...

या गटावर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे विशेष लक्ष राहिले आहे.त्यांच्या माध्यमातून या गटात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक साठी अनेक चेहरे या गटातून इच्छुक आहेत. त्यामुळे गटात मोठी चुरस आहे.या गटामध्ये जातीय समीकरणात मराठा, धनगर, माळी या तीनही जातींचे बलाबल असून इतर समाजदेखील निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यासोबतच भाजपचे नेते प्रवीण माने नेमकी कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आयात उमेदवारीच्या ही चर्चा...

वडापुरी माळवाडी हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण साठी आरक्षित झाल्यानंतर या गटात आयात उमेदवाराच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, स्थानिक नेते मंडळी याला काही अंशी विरोध ही दर्शवू शकतात.यात नेतेमंडळींची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

इच्छुकांची संख्या मोठी...

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याचा विचार करता या गटातून इच्छुकांची मोठी संख्या असून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, माजी सदस्या ऋतुजाताई पाटील, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे, डॉ. शशिकांत तरंगे, पांडुरंग मारकड,महेंद्र रेडके, विद्यमान पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,मनोहर भोसले, प्रकाश शिंदे,विशाल मारकड, गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण हरणावळ, विठ्ठल महाडिक, सुभाष बोंगाणे, दिलीप पाटील, विष्णू पाटील,अतुल व्यवहारे, बाळासाहेब व्यवहारे, श्रीनिवास सातपुते, भारत जगताप, लक्ष्मण रेडके, राजेंद्र पवार,नानासाहेब नरुटे, अमोल इंगळे, अजित खबाले, गोपीचंद गलांडे, कर्मयोगीचे संचालक सतीश व्यवहारे व शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे,प्रीतम देवकर, महेश शिर्के, भागवत काटकर, सुरेश शिंदे, संजय देवकर, शिवाजी तरंगे, लक्ष्मण देवकाते, आप्पा माने, सिताराम जानकर, राजाराम सागर, हनुमंत जमदाडे,सतीश चित्राव,नामदेव गायकवाड यांच्यासह अनेक नेते मंडळी निवडणुकीच्या तयारीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow