शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अवघ्या काही तासांवर, फक्त दोन आमदार 'सेफ'!

Jan 10, 2024 - 16:38
 0  100
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अवघ्या काही तासांवर, फक्त दोन आमदार 'सेफ'!

आय मिरर

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बुधवारी संध्याकाळी 4 वाजता विधिमंडळात हा निकाल लागणार आहे. एकनाथ शिंदेंसोबत असलेले 40 आणि ठाकरेंसोबत असलेल्या 14 आमदारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला या निकालावर अवलंबून असणार आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 19 महिन्यांनंतर राज्यातल्या सत्तासंघर्षावर निकाल देणार आहेत.

20 जून 2022 ला शिवसेनेत फूट पडली, यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार आधी सुरत आणि मग गुवाहाटीला रवाना झाले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यातल्या या सत्तासंघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टातही झाली. यानंतर मे महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना याबाबतचा निर्णय घ्यायचे आदेश दिले.

फक्त दोन आमदार सेफ

शिवसेनेचे फक्त दोन आमदार वगळता इतर सगळ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. ज्या आमदारांना अपात्र व्हायचा धोका नाही त्यात आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे बाळासाहेबांचे नातू असल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करणार नसल्याचं शिवसेना शिंदे गटाकडून आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. तर ऋतुजा लटके यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढलेली नाही, त्यामुळे त्यांची आमदारकीही सुरक्षित राहणार आहे.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके मशाल चिन्हावर निवडणूक लढल्या होत्या, त्यामुळे त्या शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार आहेत.

शिवसेना ठाकरे गटानं सर्वात आधी ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भरत गोगावले, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील लता सोनवणे आणि यामिनी जाधव यांच्या अपात्रतेबाबत निकाल दिला जाणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow