बिग ब्रेकिंग | काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरेंना संधी

Feb 14, 2024 - 12:47
 0  387
बिग ब्रेकिंग | काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरेंना संधी

आय मिरर

काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोनिया गांधी यांना राजस्थानमधून उमेदवारी देण्यात आली आहे.तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

देशभर लोकसभा निवडणुकांचा माहौल असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी असणार आहे. तर आज काँग्रेसने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून डॉ.अखिलेश सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंगवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

१३ राज्यातील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

चंद्रकांत हंडोरे यांची कारकिर्द

१९८५ मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊन, चंद्रकांत हंडोरे यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पुढे १९९२-९३मध्ये आपले खास राजकीय कौशल्य वापरून मुंबईचे महापौरपदही मिळविले. पुढे कालांतराने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. २००४ मध्ये ते चेंबूर मतदारसंघातून निवडून आले आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले. सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. मंत्रिमंडळातही आक्रमक मंत्री म्हणून त्यांची चर्चा असायची. २००९ मध्ये ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले, परंतु त्यांना अंतर्गत स्पर्धेत मंत्रिपद मिळू शकले नाही. काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी भीमशक्ती नावाचा आपला दबाव गट कायम तयार ठेवला. सामाजिक अभिसरणाच्या प्रयोगातील मोहरा किंवा चेहरा म्हणून काँग्रेसला हंडोरे यांना संसेदत नेण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

विधान परिषदेचीही उमेदवारी दिली होती

२०२२ साली झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, मतफुटीमुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्याचं म्हटलं गेलं. याप्रकरणी काँग्रेसकडून चौकशी समितीही गठीत करण्यात आली होती.

राज्यसभेच्या निवडणुका कशा होतात?

संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेली राज्यसभा हे स्थायी सभागृह असून, ते कधीही विसर्जित होत नाही. मात्र, या सभागृहाचे एक-तृतियांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. मूळ राज्यघटनेने राज्यसभा सदस्यांचा कालवधी निश्चित केलेला नाही. ती जबाबदारी संसदेकडे देण्यात आली. त्यानुसार संसदेने लोकप्रतिनिधी कायदा १९५१ पारित करीत राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत सहा वर्षे निश्चित केली आहे.

राज्यसभेला काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही म्हटलं जातं. यालाच वरिष्ठ हाऊस म्हणजे अप्पर हाऊसही संबोधलं जातं. राज्यसभेत जास्तीत जास्त २५० जागा असू शकतात तर, त्यापैकी १२ सदस्य राष्ट्रपतींकडून निवडले जातात. उर्वरित २३६ सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि २ सदस्य केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow