घर केवळ 20 किलोमीटर दूर होतं तोच काळानं घाला घातला अन् ऊसतोड मजुरांसह ट्रॅक्टर चंद्रभागेत कोसळला ! दोघांचा मृत्यू अनेक जखमी
आय मिरर
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावरून रविवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास ट्रॅक्टर आणि कंटेनर खाली कोसळले गेले. या अपघातात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर आठ लोक गंभीर जखमी आहेत. कर्नाटकातून ऊस तोडी करून कामगार आपल्या घरी परतत असताना ट्रॅक्टर पुलावरून कोसळून अपघात घडला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , कर्नाटक राज्यात ऊस तोडी करून पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील ऊस टोळी आपल्या मूळ गावी निघाली होती. घरापासून अवघे वीस किलोमीटर जवळ असताना पंढरपूरच्या चंद्रभागा नदीचा पुलावर प्रवेश करताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट पुलावरून खाली कोसळला. याचवेळी समोरून येणारा कंटेनरच्या चालकाचाही ताबा सुटला व ट्रॅक्टर सोबत कंटेनरही कोसळला. कंटेनर मध्ये केवळ ड्रायव्हर आणि एक व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर ट्रॅक्टर मध्ये ऊस तोडी करून आलेले नऊ लोक होते. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
ट्रॅक्टर आणि कंटेनर पुलावरून खाली कोसळताच. यावेळी महादेव दिलीप काळे ( वय 50 ) आणि राजू रमेश चव्हाण ( वय 40 ) अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. तर लक्ष्मण राजेंद्र चव्हाण, सुवर्णा ज्ञानेश्वर पवार , अनिता भारत काळे , विनोद सुखदेव गोमटे , नाना हनुमंत काळे तर देवांगी आणि गुड्डू या आठ आणि चार वर्षे भावंड या अपघातात जखमी झाले आहेत.
कंटेनर मधील व्यक्ती ब्रिजेशकुमार हा देखील जखमी झाला आहे.आठ जखमी व्यक्तींपैकी चार व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्यांचे हात आणि पाय फ्रॅक्चर आले आहेत.या गंभीर जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी पंढरपूरहुन सोलापूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
ही घटना घडतात सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे , तहसीलदार सचिन लंगुटे, प्रणव परिचारक , तालुका पोलीस निरीक्षक वाय टी मुजावर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काही स्थानिक तरुणांना सोबत घेत क्रेनच्या मदतीने कंटेनर आणि ट्रॅक्टर बाजूला केले. सुरुवातीला या वाहनांच्या खाली काही व्यक्ती असल्याचा संशय होता. एक ते दोन व्यक्ती वाहनांच्या खाली अडकल्याही होत्या.हे व्यक्ती गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पुलावर घडलेल्या अपघातामुळे पुलावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर हा अपघात घडल्याने पुलाचा काही भाग धोकादायक बनत चालला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आहिल्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी देखील होताना दिसत आहे.
What's Your Reaction?