तब्बल चार दशकानंतर दौंड मध्ये पंतप्रधानांची सभा ! यापूर्वी या नेत्याने घेतली होती सभा ; वाचा काय आहे इतिहास

Sep 19, 2025 - 18:41
 0  1977
तब्बल चार दशकानंतर दौंड मध्ये पंतप्रधानांची सभा ! यापूर्वी या नेत्याने घेतली होती सभा ; वाचा काय आहे इतिहास

आय मिरर 

येत्या 30 सप्टेंबर रोजी पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटस येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे.या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भाष्य करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल 40 वर्षानंतर पुण्याच्या दौंड मध्ये जाहीर सभा घेणारे नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

सन 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आले होते. त्यानंतर जवळपास चार दशकांनंतर पुन्हा एकदा देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. येत्या 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दौंड तालुक्यात येणार आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी हा कार्यक्रम पार पडणार असून, यासाठी पंतप्रधान मोदींची उपस्थिती निश्चित झाली आहे.

सन 1985 मध्ये राजीव गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ॲड. अशोक बापूराव खळदकर यांना दौंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. ॲड. खळदकर यांच्या प्रचारार्थ राजीव गांधी यांची जाहीर सभा दौंडमध्ये पार पडली. ही सभा विशेष ठरली, कारण राजीव गांधी हे पुण्यातील दौंड येथे येऊन जाहीर सभा घेणारे पहिले पंतप्रधान ठरले.

आता तब्बल 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा दौंड तालुक्यात देशाचे पंतप्रधान येत आहेत. येत्या 30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यासाठीची सभा भीमा सहकारी साखर कारखाना पाटस येथील कार्यस्थळाजवळ आयोजित करण्यात आली आहे. यामुळे दौंडवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, ऐतिहासिक परंपरेनंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या उपस्थितीने दौंड तालुका अभिमानाने उजळणार आहे.

आमदार राहुल कुल यांनी मानले आभार...

दरम्यान दौंड चे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.पंतप्रधान नरेंद मोदी हे दौंड तालुक्यात येत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामविकास अभियानाच्या शुभारंभाचे संयोजन दौंड तालुक्याला दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास मंत्र्यांचे ऋण व्यक्त करतो असं राहुल कुल म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow