मोठी बातमी || एनसीबी ची पुण्यात छापेमारी, दोनशे किलो अल्प्राझोलमचा साठा जप्त

Oct 13, 2023 - 13:50
 0  354
मोठी बातमी || एनसीबी ची पुण्यात छापेमारी, दोनशे किलो अल्प्राझोलमचा साठा जप्त

आय मिरर

मुंबई येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी आणि जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथे छापे टाकून अमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा सुमारे दोनशे किलो अल्प्राझोलमचा साठा जप्त केला.त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.

ललित पाटील हा ससून रूग्णालयातून अमली पदार्थाची तस्करी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, अमली पदार्थ विरोधी पथकाने राज्याच्या विविध भागात धाडसत्र सुरू केले आहे. शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडीच्या दुर्गम भागात केलेल्या कारवाईत कोट्यवधींचा १७४ किलो अल्प्राझोलमचा साठा जप्त केला. मुंबईच्या पथकाने शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, मिडगुलवाडीत झाडाझुडपांनी वेढलेल्या जागेत पत्र्याचे शेड टाकून हा अमली पदार्थांचा धंदा सुरू होता. अनेकदा ग्रामस्थांनी येथे काय चालते, असे विचारले असता फरशी पुसण्यासाठी लागणारे फिनेल बनविण्याचे काम चालत असल्याचे संबंधित व्यावसायिक सांगत असत.

मुंबई व आंध्र प्रदेशमधील हे लोक असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अल्प्राझोलम हे निद्रानाशावर उपचार करण्यासाठी येणाऱ्या औषधीत वापरण्यात येते. परंतु त्याचा अमली पदार्थ बनविण्यासाठी वापर करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नारायणगावमध्ये २६ किलो अल्प्राझोलम जप्त - पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील कारवाईत २६ किलो अल्प्राझोलम जप्त केले आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. 'एनसीबी'च्या कारवाईला नारायणगाव पोलिसांनी दुजोरा दिला आहे. येथील वडगाव सहानी रस्त्यालगत स्थानिक शेतकऱ्याचे पत्र्याचे शेड आहे. हे शेड त्यांनी जुन्नर येथील एका व्यक्तीला भाड्याने दिले होते. याठिकाणी अमली पदार्थ तयार करण्यात येत असल्याची माहिती मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने कारवाई केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow