त्यांनी बारामतीच्या जगदंबा मध्ये हात साफ केले ! मग पोलीस निरीक्षक यादवांनी त्यांना साफ केले अन् ते पोपटासारखे बोलले...
आय मिरर
बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथील हॉटेल जगदंबा मध्ये झालेल्या चोरी आणि घरफोडी प्रकरणातील चार आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी गजाआड केलं आहे.या आरोपींनी बारामती नीरा या ठिकाणी देखील चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. बारामती न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून अनिल सुनिल निकम आणि गणेश मधु निकम हे दोघेही भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथील रहिवासी आहेत तर रवी मंगेश जाधव आणि रवी बंडु थोरात हे दोघेही मुळशी तालुक्यातील म्हातोवबानगर मधील असून सध्या ते इंदापूर तालुक्यातील रुई गावात राहत होते.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून दि. १७ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या दरम्यान, बरमत तालुक्यातील वंजारवाडी येथील हॉटेल जगदंबाच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 32 हजार रुपयांचा मोबाईल आणि रोग रक्कम चोरी केली होती.या प्रकरणी विजय मोहिते यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यावेळी पोलीस पथकाला या चोरी संदर्भात गोपनीय बातमीदारामार्फत काही खबर मिळाली.त्यानुसार पोलिसांनी भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथील अनिल सुनिल निकम आणि गणेश मधु निकम यांना ताब्यात घेतले. यावेळी या दोघांनी त्यांचे साथीदार रवी मंगेश जाधव आणि रवी बंडु थोरात यांच्यासोबत ही चोरी केल्याचं कबूल केलं.
रवी जाधव आणि रवी थोरात हे दोघेही मूळचे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील म्हातोबानगर येथील रहिवाशी असून ते सध्या इंदापूर तालुक्यातील रुई येथे राहत होते. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने या दोघांनाही इंदापूर तालुक्यातील रुई येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच या चौघांनीही हॉटेल जगदंबा मध्ये चोरी केल्याचं कबूल केलं. यासोबतच पोलिसांनी
या आरोपींकडून चोरीस गेलेले विविध कंपन्यांचे एकूण ७ मोबाईल फोन आणि १,०५० रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. पुढील तपासात आणखी मोबाईल हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार दादासाहेब दराडे, सुरेंद्र वाघ, किशोर वीर, भारत खारतोडे, निलेश वाकळे आदींनी केली आहे.
What's Your Reaction?