इंदापुरात आज बी-बियाणे विक्रेत्यांचा एकदिवसीय बंद ; हे आहे कारण...
आय मिरर
केंद्र सरकारने रासायनिक खतांसाठी 'पॉश मशीन'ची सक्ती केल्यानंतर आता बी-बियाण्यांची विक्री 'साथी पोर्टल' वरच करण्यात यावी असा निर्णय घेतलाय. याची अंमलबजावणी महाराष्ट्रातून सुरु केल्याने आज पुण्याच्या इंदापुरात बी-बियाण्यांची विक्री करणाऱ्या दुकान चालकांनी आपापली दुकाने बंद ठेऊन या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
आज संपूर्ण राज्यात या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी बी-बियाणे विक्रेते आपापली दुकाने बंद ठेवणार आहेत.त्याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या इंदापूर शहरात देखील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली आहेत.
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाणे मिळावे असा सरकारचा मूळ उद्देश आहे त्यामुळे केंद्र सरकारने ज्या पद्धतीने रासायनिक खत विक्रेते हे 'पॉश मशीन' च्या व्दारे खतांची विक्री करतात त्याप्रमाणे आता बी बियाणे विक्री करताना ती साथी पोर्टल च्या माध्यमातून करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.याची अंमलबजावणी देखील महाराष्ट्र राज्यापासून सुरू झाली आहे.यामुळे बी-बियाणे विक्रेत्यांच्या मध्ये असंतोष पसरला आहे.
का होतोय विरोध...
दर्जेदार बियाणे निर्मिती करण्याची जबाबदारी ही बियाणे कंपन्यांची आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने 'साथी पोर्टल'चा वापर बियाणे कंपन्यांच्या पातळीवर करणे खरी गरज आहे. त्यामुळे विक्रेत्यांना 'साथी पोर्टल' सक्ती रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस डिलर्स असोसिएशनची आहे.
त्यास अनुसरून इंदापूर तालुका सिडस् पेस्टीसाईडस् अॅण्ड फर्टिलायझर्स डिलर्स असोसिएशन कडून ही इंदापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अमोल भिसे,संजय दोशी,विठ्ठल पाटील,अनिल शहा,महेश अवताडे,गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?