बारामतीत हाकेंचा मोर्चा, हाकेंसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल
आय मिरर
पोलिसांनी परवानगी नाकारली असताना ओबीसी मोर्चा काढल्या प्रकरणी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या मुंबई झालेल्या आंदोलनावेळी मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी बांधवांबद्दल अपशब्द काढले होते. याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पाच सप्टेंबर रोजी बारामतीत ओबीसी बहुजन एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं.
बारामती पोलिसांनी ईद आणि गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, तरी देखील लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात प्रशासकीय भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
5 सप्टेंबरला काढला होता एल्गार मोर्चा...
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या मराठा आणि ओबीसी असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण प्रश्नी विविध मागण्या घेऊन उपोषणाला बसले होते. 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत हैदराबाद गॅझेट लागू करत असल्याचा अध्यादेश काढला. यासह इतरही काही मागण्या मान्य करण्यात आल्या. तेव्हापासून राज्यभरात ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी बांधवांची हरकत नाही मात्र ते ओबीसी प्रवर्गातून न देता स्वतंत्र रीत्या द्यावे अशी मागणी ओबीसी आंदोलकांची आहे. राज्य सरकार मराठा समाजाला ओबीसी मध्ये घुसवत असल्याने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागतोय असा आरोप करत ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती मध्ये 5 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी एल्गार मोर्चा काढला होता. यात हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते. मात्र गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर बारामती पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्याच अनुषंगाने आता बारामती पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे.
What's Your Reaction?