मोठी बातमी | अण्णासाहेब गिरीचा फास आणखी आवळला ; गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणानंतर आता बलात्काराचा आरोप
आय मिरर
दौंड तालुक्यात केडगाव मध्ये गाजलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणातील अटक आरोपीवर पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यवत पोलिसांनी केडगाव येथील ४२ वर्षीय अण्णासाहेब आप्पा गिरी याला प्रोडक्शन वॉरंटद्वारे येरवडा कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे.
अण्णासाहेब गिरी यांच्या विरोधात १६ सप्टेंबर रोजी यवत पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नव्या बलात्काराच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने या गुन्ह्याचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक संतोष तारसांगवकर करीत आहेत.
कोण आहे अण्णासाहेब गिरी ? काय आहे गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण...
दौंड तालुक्यातील केडगाव मध्ये एका घरामध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती.दरम्यान याची माहिती मिळताच यवत पोलिसांनी 20 मे रोजी पोलिसांनी कारवाई करत मुख्य बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याला रंगेहात अटक केली होती.
दरम्यान याचा खोलवर तपास केल्यानंतर पोलिसांनी पुण्यातील वाघोली येथून डॉ.अतुल जाधव याला तत्काळ अटक केली.पुढे या प्रकरणाचा यवत पोलिसांकडून तपास सुरू असताना सोनोग्राफी मशीन पुरवणारा आरोपी नरेंद्र ठाकरे याच्यासह उरुळी कांचन येथील डॉ. सुंदरम कदम आणि भोर तालुक्यातील डॉ.मंदार माळी यांची नावे समोर आली.हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत तर नरेंद्र ठाकरे सध्या एका गुन्ह्यात तो जेलमध्ये आहे.
या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एस आय टी ला डॉक्टर संगीता गायकवाड या त्यांच्या पार्थ हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे महिलांचा गर्भपात करत होत्या याचे ठोस पुरावे सापडले आणि त्यानंतर बुधवारी 17 जून 2026 रोजी दुपारी दोनच्या सुमारास यवत पोलिसांनी त्यांच्या अटकेची कारवाई केली.
17 जून 2026 ला या प्रकरणात यवत पोलिसांनी पार्थ हॉस्पिटलची संचालिका डॉक्टर संगीता गायकवाड हिला अटक केली होती तिच्याकडे केलेल्या सखोल चौकशीनंतर या प्रकरणात मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याची मदतनीस सदिच्छा शिंदे होती. तिच्या माध्यमातूनच या सर्व गोष्टी चालायच्या.सदिच्छा शिंदे ही गरोदर महिलांना मुख्य आरोपीच्या शिंदवणी येथील फार्म हाऊस आणि सिताई हाके नगर येथील फ्लॅटवर घेऊन जायची आणि त्या ठिकाणी त्यांची बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान चाचणी केली जात होती हे तपासात समोर आलं आहे.
त्यानंतर यवत पोलिसांनी सदिच्छा दिलीप शिंदे उर्फ सदिच्छा लक्ष्मण भोसले हिला देखील या प्रकरणी अटक केली.सदिच्छा शिंदे ही या प्रकरणातील मुख्य आरोपी बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याची निकटवर्ती होती आणि गर्भलिंग निदानासाठी घेतले जाणारे पैसे हे सदिच्छा शिंदे हिच्या बँक खात्यावर जमा होत असल्याचा तपासात पुढे आलं आहे.
What's Your Reaction?